नवी दिल्ली : नव्या वर्षाच्या मार्चमध्ये होणाऱ्या आसाम विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आसामच्या प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्या हाती शनिवारी सोपवली. आसाममधून मोदींच्या मंत्रिमंडळात सोनोवाल हे एकमेव राज्यमंत्री आहेत.विद्यार्थीदशेपासून राजकारणात सक्रीय असलेले सोनोवाल आसाममधे लोकप्रिय आहेत. गतवर्षीच्या लोकसभा निवडणुकीत आसाममधे भाजपला १४ पैकी ७ जागा मिळाल्या, १२६ विधानसभा मतदारसंघांपैकी ६९ मतदारसंघात भाजपचे उमेदवार आघाडीवर होते. याचे बरेचसे श्रेय सोनोवाल यांच्या कुशल नेतृत्वाचेच आहे, असे जाहीररित्या पक्षाध्यक्ष शहा यांनी नमूद केले आहे. लोकसभा निवडणुकीतल्या अभूतपूर्व यशानंतर २0१६ सालच्या मार्च महिन्यात होऊ घातलेल्या आसाम विधानसभा निवडणुकीत भाजपने १२६ पैकी ८४ जागा जिंकण्याचा संकल्प केला आहे. त्यासाठी पक्षाध्यक्षांनी ‘आसाम मिशन ८४’ पूर्वीच जाहीर केले आहे. बिहारच्या ताज्या अपयशानंतर सोनोवाल यांच्याकडे हे अवघड मिशन पार पाडण्याची जबाबदारी पक्षाने सोपवली आहे. आसाममधे १२६ जागांच्या विधानसभा तिकिटासाठी भाजपकडे सुमारे ३ हजार इच्छुकांनी अर्ज केल्याची माहिती, अध्यक्षपदी नियुक्ती होण्यापूर्वीच सोनोवाल यांनी पत्रकारांना दिली. (विशेष प्रतिनिधी)
आसाम भाजपाच्या प्रदेशाध्यक्षपदी सोनोवाल
By admin | Published: November 22, 2015 1:55 AM