नवी दिल्ली - लॉकडाऊन काळात गरजूंना मदत करण्यासाठी पुढाकार घेतल्यानंतर बॉलीवूड अभिनेता सोनू सूदचं (Sonu Sood) नाव राजकीय वर्तुळातही खूप चर्चेचा विषय ठरलं. सोनू सूदच्या सामाजिक कार्यामुळे लोक त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव करू लागले. यातच सोनू सूद आता अभिनयानंतर राजकीय क्षेत्रातही उडी घेणार असल्याच्या चर्चा देखील सुरू झाल्या. त्यावर सोनू सूदनं असा कोणताच इरादा नसल्याचं स्पष्ट करत अभिनय क्षेत्रातच राहणार असल्याचं याआधीच स्पष्ट केलं होतं. त्यानंतर सोनू सूदची बहीण मालविकाने राजकीय क्षेत्रात एन्ट्री घेतली आहे.
सोनू सूदची बहीण मालविका पंजाब विधानसभा निवडणुकीत आपलं नशीब आजमावत आहे. पंजाबच्या मोगा विधानसभा मतदारसंघातून तिला काँग्रेसने उमेदवारी जाहीर केली आहे. सोनू सूद देखील बहिणीच्या प्रचारासाठी मोगा येथेच होता. याच दरम्यान आता सोनू सूदला मोगा येथे मतदान केंद्रावर जाण्यापासून रोखण्यात आलं आहे. पंजाबमध्ये सुरू असलेल्या मतदानादरम्यान सोनू सूदची कार पोलिसांकडून जप्त करण्यात आली. एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, मतदान केंद्रावर प्रवेश करण्याचा प्रयत्न करणाऱ्या सोनू सूदची कार जप्त करून त्याला घरी पाठवण्यात आलं आहे.
मोगा जिल्ह्याचे पीआरओ प्रभदीप सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, जर सोनू सूद घराबाहेर पडला तर त्याच्यावर कारवाई केली जाईल. सोनू सूद मतदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप होत आहे. याप्रकरणी शिरोमणी अकाली दलाने तक्रार केली होती. त्याचवेळी सोनू सूदने हे आरोप फेटाळून लावले आहेत. आपण फक्त मतदान केंद्राबाहेरील काँग्रेसच्या बूथला भेट देत होतो असं म्हटलं आहे. "मी सुरुवातीपासूनच सांगत आलो आहे. मी कोणत्याही राजकीय पक्षाचं प्रतिनिधीत्व करत नाही. मी आजही एक सामाजिक कार्यकर्ताच आहे आणि जे काम आधीपासून करत होतो तेच आजही करत आहे. माझी बहीण देखील माझ्यासारखीच लहानपणापासूनच राजकारणापेक्षा समाजकार्याशीच अधिक जोडली गेलेली आहे. आमची ही चौथी पिढी आहे की जी सामाजिक कार्यात आहे. माझे आजोबा आणि पूर्वजांनी मोगामध्ये अनेक शाळा, रुग्णालयं उभारली आहेत."
"माझ्या आईनं आयुष्यभर लहान मुलांना मोफत शिक्षण दिलं आहे. तर माझ्या वडिलांचं कपड्याचं दुकान होतं आणि ज्या गरीबांना लग्नाचा खर्च करणं परवडत नव्हतं अशांना माझे वडील मदत करत आले आहेत. आम्ही देखील त्यांच्याच पावलावर पाऊल ठेऊन समाजकार्य करत आहोत. आताही मालविकानं मोगा मधील जनतेचं मोफन लसीकरण केलं आहे. शिक्षण असो किंवा मग आरोग्य सर्वच गोष्टींमध्ये मालविका आधीपासूनच खूप सक्रिय आहे. लोकांनी तिला राजकारणात येण्यासाठी आग्रह केला. तिनं माझ्याशीही याबाबत चर्चा केली आणि समाज बदलण्यासाठी प्रशासनात येणं गरजेचं असल्याचं तिचं मत आहे. त्यामुळेच मालविका आज राजकीय क्षेत्रात पाऊल टाकत आहे" असं सोनू सूदने याआधी म्हटलं आहे.