मुंबई - बॉलिवूड अभिनेता सोनू सूदने कोरोनाच्या पहिल्या लाटे दरम्यान अनेक मजूरांना त्यांच्या घरी पोहोचण्यास मदत केली होती. तर, दुसऱ्या लाटेतही सोनू सूदने अनेकांना औषधं, ऑक्सिजन सिलेंडर, इंजेक्शन मिळून दिले आहे. त्यामुळे अनेकांसाठी सोनू सूद देवदूत ठरला आहे. लोकांना मदत करण्याचा सोनूचा हा दिनक्रम लॉकडाऊननंतर ही सुरूच आहे. त्यामुळेच, पडद्यावर व्हिलन असलेल्या, पण प्रत्यक्ष जीवनात हिरो ठरलेल्या सोनूचे चाहते त्याच्यासाठी कायपण म्हणत त्याच्या कामाचं कौतुक करत आहेत.
तेलंगणातील एका चाहत्याने सोनूला भेटण्यासाठी तब्बल ७०० किलोमीटर पायी प्रवास केला आहे. व्यंकटेश हरिजन असे त्याचे नाव असून तो हैदराबादहून मुंबईला अनवाणी चालत आला आहे. तेलंगणाच्या विकाराबाद जिल्ह्यातील दोरनापल्ली या गावचा तो रहिवाशी आहे. व्यंकटेश हा बारावीला शिक्षण घेत आहे. त्याचे वडिल ऑटो रिक्षा चालवतात, तर आईचे निधन झाले आहे. व्यंकटेशने 1 जून रोजी आपल्या मुंबई प्रवासासाठी प्रस्थान केले होते. तब्बल 10 दिवसानंतर तो मुंबईत पोहोचला आहे.
रियल हिरो बनला सोनू
सोनू सूदने कोरोना काळात लोकांची मोठी मदत केली. हॉस्पिटल बेड असो, औषधे असो, कामगारांना घरी पाठवण्याची सोय असो हे सगळे त्याने केले. त्याचे अनेक स्तरातून भरपूर कौतुक होत आहे. त्यातून जगभरात सोनूचे चाहते तयार झाले आहेत. पडद्यावरील हिरोपंतीपेक्षा रियल लाईफमधील हिरो म्हणून कोट्यवधी चाहत्यांना त्याने आपलंसं केलं आहे.