मुंबई - अभिनेता सोनू सूद म्हणजे मदतीचा हात, सोनू म्हणजे मसीहा असंच समीकरण जणू तयार झालं आहे. कारण, कोरोना लॉकडाऊन पासून सोनू सूद त्याच्या चित्रपटापेक्षा सामाजिक आणि विधायक कार्यामुळेच चर्चेत असतो. आताही बॉलिवूडच्या अभिनेत्यानं हिरोवालं काम केलंय. सोनू सूदच्या मदतीमुळे बिहारमधील एका लहान मुलीवर मोठी शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली आहे. त्यामुळे, 4 हात आणि 4 पाय असलेली चहुँमुखी आता सामान्य माणसांप्रमाणे जीवन जगणार आहे.
सूरतमधील एका रुग्णालयात चहुंमुखीवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. या शस्त्रक्रियेचा संपूर्ण खर्च सोनू सूदने केला आहे. सध्या तिला रुग्णालयातच राहावे लागणार आहे. मात्र, काही दिवसांनी ती रुग्णालयातून बाहेर येईल, आणि सर्वसामान्य जीवन जगेल. तिच्या या नवीन आयुष्याला घडविणाऱ्या सोनू सूदचं याबाबत चांगलंच कौतुक होत आहे. चहुमुखी ही नवादा जिल्ह्यातील वारसलीगंज तालुक्यातील हेमदा गावची रहिवाशी असून ती केवळ 2.5 वर्षांची आहे. सूरतच्या एका खासगी रुग्णालयात तिच्यावर मोठी शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली.
चहुमुखीला जन्मापासूनच 4 हाथ आणि 4 पाय होते. सोशल मीडियावर तिचे फोटो व्हायरल झाल्यानंतर सोनू सूदने तिच्या मदतीसाठी हात पुढे केले. सोनून तिच्या ऑपरेशनसाठीचा संपूर्ण खर्च करण्याची घोषणा केली. त्यानुसार, आता तिच्यावर शस्त्रक्रिया पार पडली आहे. त्यामुळे, चहुमुखी आता इतर सामान्य मुलांप्रमाणे खेळू आणि बागडू शकणार आहे. तसेच, शाळेतही जाऊ शकेल.
7 तास चालली शस्त्रक्रिया
सौर ग्रामपंचायतीच्या सरपंच गुडिया देवी यांचे पती दिलीप राऊत चहुमुखी आणि तिच्या कुटुंबाला घेऊन 30 मे रोजी मुंबईत आले होते. तिथे त्यांनी सोनू सूदची भेट घेतल्यानंतर तिच्यावर उपचार करण्यासाठी चहुमुखीला सुरतला पाठविण्यात आले. सुरतच्या किरण रुग्णालयात डॉ. मिथुन आणि त्यांच्या टीमने जवळपास सलग 7 तास शस्त्रक्रिया करुन तिच्यावर उपचार केले.