मुंबई - बिहारमधील एका छोट्या चिमुकल्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. त्यानंतर, हा चिमुकला बिहार-युपीसह सोशल मीडियावर प्रसिद्ध झाला आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासोबत बिनधास्त संवाद आणि लालू प्रसाद यादव यांचे सुपुत्र आणि आमदार तेजप्रताप यादव यांना या लहानग्याने दिलेल्या उत्तराने अनेकांची मने जिंकली आहेत. सोनू नावाच्या 12 वर्षीय शाळकरी मुलाने या मुलाने तेजप्रताप यादव यांना रोखठोक शब्दात सुनावले. आता, सोनूच्या मदतीसाठी सोनू सूद धावून आला आहे. विशेष म्हणजे नेतेमंडळींनी फक्त आश्वासनं दिली, पण सोनून काम फत्तेच केलं.
बिहारच्या नालंदा येथील 12 वर्षीय सोनू सोशल मीडिया सेन्सेशन बनला आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासमोर बिनधास्तपणे आपले गाऱ्हाणं मांडल्यामुळे सोनू चर्चेत आला. सरकारी शाळेतल्या शिक्षकाला इंग्रजी येत नाही, मला इंग्लीश मीडियमध्ये शिक्षण द्यावं, अशी मागणीच त्याने नितीश कुमार यांच्याकडे केली होती. त्यानंतर, राजदचे आमदार तेजप्रताप यादव यांनी व्हिडिओ कॉलद्वारे सोनूला साधलेला संवादाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यांच्याकडेही सोनूने इंग्लीश मीडियमध्ये शिकण्याची इच्छा व्यक्त केली. त्यावर, त्यांनीही आश्वासन दिलं. मात्र, सोनू सूदेने थेट दखल घेत या लहान्या सोनूचं अॅडमिशनचं काम इंटरनॅशनल पब्लिक स्कुलमध्ये केलं आहे.
तेजप्रताप यादवांना थेट दिलं उत्तर
व्हायरल व्हिडिओत तेजप्रताप यादव हे व्हिडिओ कॉलिंगद्वारे चिमुकल्या सोनूचं कौतूक करत आहेत. मी तुझा फॅन झालोय, तू धाडसी आणि स्मार्ट मुलगा आहे. तू बिहारचा स्टार आहेस, असे तेजप्रताप यांनी म्हटलं. त्यावर, आपण काका या नात्यानं माझा शाळेत प्रवेश करुन द्या असे सोनूने म्हटले. त्यावर, तू मोठा होऊन काय बनणार आहेस, असा प्रश्न तेजप्रताप यांनी विचारला. त्यावर, मी आयएएस बनेल, असे उत्तर सोनून दिले. तेव्हा, मी बिहारच्या सरकारमध्ये येईल, तोपर्यंत तूही आयएएस होशील. मग, तू माझ्या अंडर काम करशील, असे तेजप्रताप यांनी म्हटलं. तेजप्रताप यांच्या प्रश्नावर सोनूने दिलेल्या उत्तराने तेजप्रताप हेही अवाक् झाले. मी कुणाच्याही अंडर काम करणार नाही, जर तुम्ही माझी मदत करत असाल तर धन्यवाद.. असे सडेतोड आणि बिनधास्त उत्तर सोनूने दिले. या उत्तरामुळे सोनूचा हा व्हिडिओ कॉल सगळीकडे व्हायरल झाला आहे.