ऑनलाइन लोकमत
भोपाळ, दि. 21 - मशिंदीवरील भोंग्यामुळे झोप मोड होत असल्याचे वादग्रस्त ट्विट करणारा बॉलिवूडचा सुप्रसिद्ध गायक सध्या चर्चेत आहे. त्यानं केलेल्या अजान ट्विटचा वाद अजूनही मिटलेला नाही.
सोशल मीडियावरही काही नेटीझन्स सोनू निगमच्या समर्थनात मत मांडत आहेत तर काही जण त्याला खडेबोल सुनावत आहेत. अशातच सोनूनं मांडलेल्या मताचं समर्थन करत त्याला पाठिंबा दर्शवणं मध्य प्रदेशातील एका तरुणाला चांगलंच महागात पडले आहे.
फेसबुकवर सोनूचं समर्थन करणारी पोस्ट केल्यानं दोन गटात बाचाबाची झाली. यानंतर हा वाद इतक्या टोकाला गेला की निगमचे समर्थन केल्याने मुलांच्या एका गटाने शिवम नावाच्या तरुणावर चाकूने वार केले. उज्जैन येथील फ्रीगंज परिसरातील हा धक्कदायक प्रकार आहे. जखमी मुलाचे नाव शिवम असून त्याच्या मित्रालाही संशयितांनी भोसकलं आहे.
काय आहे नेमकी घटना?
उज्जैनमध्ये राहणा-या शिवमने फेसबुकवर सोनू निगमच्या समर्थनार्थ एक पोस्ट केली. यात त्यानं "यापुढे आपण आता फक्त सोनू निगमचीच गाणी ऐकणार", असे लिहिले होते. त्यावरून फैजान खान व त्यांच्या मित्रांनाही शिवमला पोस्टबाबत जाब विचारला. यावरुन शिवम आणि फैजान यांच्या गटात बाचाबाची झाली.
यानंतर शिवम एका मित्राच्या वाढदिवसासाठी त्याच्याकडे गेलेला असताना तेथे फैजान आणि त्याचे मित्रही हजर होते. शिवमला पाहून आरोपींचा राग अनावर झाला आणि त्यांनी शिवमसहीत त्याच्या मित्रावर हल्ला केला, असे शिवमने पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी संबंधित तरुणांवर हत्येचा गुन्हा पोलिसांनी दाखल केला आहे.
सोनू निगमचे वादग्रस्त ट्विट
सुप्रसिद्ध गायक सोनू निगमनं 17 एप्रिल रोजी मशिदीवरील भोंग्याद्वारे होणा-या अजानवर आक्षेप नोंदवत ट्विट केले होते. "मी मुस्लिम नाही, तरीही सकाळी मला अजानमुळे उठावं लागतं. भारतात सक्तीची धार्मिकता कधी थांबणार?", असा प्रश्न सोनूनं ट्विटरद्वारे उपस्थित केला होता. या ट्विटवरुन कुणी सोनूचे समर्थन केले तर काहींनी त्याला खेडबोल सुनावले.
यावर, पश्चिम बंगालमधील अल्पसंख्याक युनायटेड काउंसिलचे उपाध्यक्ष सय्यद शाह आतेफ अली कादरी यांनी तर निगमविरोधात फतवा काढला होता. सोनू निगमचे मुंडण करून त्याला जुन्या चपलांचा हार घालणाऱ्याला 10 लाखांचे बक्षीस जाहीर केले होते. त्यांच्या या फतवावजा धमकीला सोनूनं सडेतोड उत्तर देत एका मुस्लीम मित्राकडून मुंडण करुन घेतले.
यानंतर सोनू निगमने पत्रकार परिषद घेत आपली बाजूदेखील मांडली. ज्या व्यक्तीने संपूर्ण आयुष्यात मोहम्मद रफी यांना वडील मानले, ज्याच्या गुरूचे नाव उस्ताद गुलाम मुस्तफा खान आहे, तो मुस्लीमविरोधी कसा असू शकतो, असा सवाल त्याने केला.
"माझ्या ट्विटचा चुकीचा अर्थ लावण्यात आला असून, कुणालाही दुखावण्याचा हेतू नव्हता", असेही त्याने स्पष्ट केले होते.