भुवनेश्रर, दि. 5 - भारताच्या नव्या संरक्षणमंत्री झालेल्या निर्मला सीतारामन यांनी रविवारी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला. ट्विटर आणि गुगलवर तर फक्त आणि फक्त त्यांच्याच नावाची चर्चा होती. केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल झाले आणि निर्मला सीतारामन यांना संरक्षणमंत्रीपद देण्यात येत असल्याचं जाहीर झालं. यानंतर सगळीकडे निर्मला सीतारामन यांची चर्चा सुरु झाली. मिळालेल्या माहितीनुसार, फक्त एका दिवसात 14 लाख लोकांनी निर्मला सीतारामन यांना ट्विटरवर फॉलो केलं आहे. संरक्षणमंत्रीपद मिळताच तब्बल 14,07,300 नवे ट्विटर फॉलोअर्स निर्मला सीतारामन यांना मिळाले आहेत. आता त्यांचा ट्विटर फॉलोअर्सचा आकडा 15,41,783 इतका आहे.
संरक्षणमंत्रीपदी बढती होण्याआधी वाणिज्य मंत्रालयाचा स्वतंत्र कारभार सांभाळणा-या निर्मला सीतारामन यांनी गुगल सर्चमध्येही बाजी मारली आहे. रविवारी सर्वात जास्त सर्च करण्यात आलेलं नाव त्याचं होतं. विशेष म्हणजे त्यांनी सध्या जगभर दहशत पसरवणा-या उत्तर कोरियालाही मागे टाकलं. सर्च करणा-यांमध्ये सर्वात जास्त लोक तामिळनाडूमधील होते.
पहिल्या महिला संरक्षणमंत्री म्हणून जास्त सर्च देण्यात आला असून यामध्ये गोवा पहिल्या क्रमांकावर होता. यानंतर उत्तराखंड आणि झारखंडमधून सर्वात जास्त गुगल सर्च करण्यात आलं. निर्मला सीतारामन यांच्यानंतर पियुष गोयल हे गुगलवर सर्वात जास्त सर्च करण्यात आलेले दुसरे व्यक्ती ठरले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जम्बो मंत्रिमंडळात फेरबदल करण्यात आला असून नऊ नवे मंत्री समाविष्ट करण्यात आले तर चार स्वतंत्र पदभार आणि राज्यमंत्री असणाऱ्या मंत्र्यांना बढती देण्यात आली. या फेरबदलात एकमेव महिला मंत्र्याचे नाव होते ते म्हणजे निर्मला सीतारामन यांचे. सीतारामन या आता देशाच्या संरक्षणमंत्री झाल्या आहेत. त्या इंदिरा गांधी यांच्यानंतरच्या देशाच्या दुसऱ्या महिला संरक्षणमंत्री ठरल्या आहेत. याआधी इंदिरा गांधी यांनी 1975 साली काही काळ आणी 1980 ते 1982 या काळात देशाचे संरक्षण मंत्रालय सांभाळले होते.
निर्मला सीतारामन यांचा जन्म १८ आँगस्ट १९५९ रोजी तामिळनाडूतील मदुराई येथे झाला. तामिळनाडूमध्ये बी.ए पर्यंत शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी दिल्लीमधील जवाहरलाल नँशनल युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश घेतला. तेथे एक हुशार विद्यार्थिनी असा लौकिक त्यांनी मिळवला. परराष्ट्र संबंधात पी. एचडी पदवी मिळवल्यावर त्यांनी प्राइसवाँटर कूपर्स आणि बीबीसीमध्ये काही काळ काम केले. आंध्र प्रदेशातील राजकीय नेते प्रकला प्रभाकर यांच्याशी त्या १९८६ साली विवाहबद्ध झाल्या. प्रभाकरसुद्धा जेएनयूचे विद्यार्थी होते. विशेष म्हणजे प्रभाकर यांच्या घरात काँग्रेस पक्षाचा राजकीय वारसा चालत आलेला आहे. निर्मला सीतारामन यांच्या सासू आंध्रप्रदेशात काँग्रेस पक्षाच्या आमदार होत्या तर सासरे तेथे काँग्रेस सरकारमध्ये मंत्री होते. प्रकला प्रभाकर काही काळ अभिनेता चिरंजिवी यांच्या प्रजाराज्यम पक्षात कार्यरत होते, तसेच आंध्र प्रदेशात भाजपाचे प्रवक्तेपदही त्यांनी सांभाळले. निर्मला सीतारामन राष्ट्रीय महिला आयोगाच्याही सदस्या होत्या. आंध्र प्रदेशातील प्रणवा स्कूलच्या संस्थापक सदस्या आहेत.
२००६ साली त्या भाजपाच्या प्रवक्तेपदी निवडल्या गेल्या. उत्तम इंग्लिश, सफाईदार मुद्दे मांडणे यामुळे त्या भाजपाची इंग्रजी वृत्तवाहिन्यांवर बाजू मांडणाऱ्या प्रवक्त्या म्हणून प्रसिद्ध झाल्या. २०१४ साली त्या केंद्रीय मंत्रिमंडळात वाणिज्य आणि उद्योग खात्याच्या राज्यमंत्री झाल्या. त्या सध्या कर्नाटकमधून राज्यसभेत निवडून गेल्या आहेत. लोकसभेत अण्णाद्रमुकच्या खासदारांनी शिवकाशी येथिल फटाका उद्योगाबाबत विचारलेल्या प्रश्नावर तमिळमधूनच उत्तर देऊन त्यांनी सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता, या उत्तरात अण्णाद्रमुकच्या खासदारांप्रमाणे सुरुवातीस त्यांनी पुरुचीथलैवी अम्मा असा जयललितांचा उल्लेख केल्याने सभागृहात हास्याची कारंजी उसळली होती.