नवी दिल्ली - मोदी सरकारच्या केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार बुधवारी होऊन ४३ मंत्र्यांचा राष्ट्रपती भवनामध्ये शपथविधी झाला. त्यामध्ये १५ जणांनी कॅबिनेट तर २८ जणांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली. महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते नारायण राणे यांना कॅबिनेट तर कपिल पाटील, डॉ. भारती पवार, डॉ. भागवत कराड यांना राज्यमंत्रीपद देण्यात आले आहे. त्यामध्ये, भारती पवार आणि भागवत कराड यांच्या नावावर ऐनवेळी शिक्कामोर्तब झाले. त्यामुळेच, मंत्रीपद मिळणार हा सुखद धक्का होता, असे खासदार पवार यांनी म्हटले.
मोदींचे मंत्रिमंडळ आता ७८ जणांचे झाले असून त्यात ३८ नव्या चेहेऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील 4 खासदारांचा समावेश असून हे चारही नेते वेगळ्या पक्षांतून भाजपात आले आहेत. त्यामध्ये, नाशिकच्या दिंडोर मतदारसंघातून डॉ. भारती पवार खासदार बनल्या आहेत. द्रांक्षे आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा हा मतदारसंघ आहे. मात्र, भारती पवार यांना मंत्रीपद दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे यासंदर्भात भारती पवार यांनी हा सुखद धक्का असल्याचं म्हटलं.
सुखद धक्का होता, मला रडायलाच आलं
दिल्लीत आल्यानंतर मला मंत्रीपद मिळणार असल्याचं समजलं. खरं सांगू तर मी रडायलाच लागले होते, हे काय चाललंय, कसं चाललंय हे समजत नव्हतं. पण, हा सुखद धक्का होता, अशी प्रतिक्रिया नव्याने केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेतलेल्या डॉ. भारती पवार यांनी बीबीसी मराठीशी बोलताना व्यक्त केली आहे. आमच्यासारख्य सामान्य कार्यकर्त्याला न्याय देण्याचा प्रयत्न नवीन मंत्रिमंडळात झालं आहे. माझ्यासह अनेक महिलांना संधी देण्यात आली. भाजपमध्ये काहीही होऊ शकतं, काम करणाऱ्यांना संधी मिळू शकते, हा संदेशही या निवडीतून देण्यात आल्याचं पवार यांनी म्हटलं.
मोदींनी मराठीत संवाद साधला
मोदींसमवेतच्या बैठकीत संध्याकाळच्या शपथविधीसंदर्भात सांगण्यात आले. यावेळी मोदींनी आमच्याशी संवाद साधला, माझ्याशी बोलताना ते मराठीत बोलले. काय कसं काय, महाराष्ट्राचं काय चाललंय.. असा प्रश्न मोदींनी विचारला. मोदींनी आपुलकीने विचारपूस केली, असेही भारती पवार यांनी सांगितले.
सासऱ्यांच्या पुण्याईने मंत्रीपद मिळाले
मी डॉक्टरकी करताना कधीही राजकारणाचा विचार केला नव्हता. पण, माझे सासरे स्वर्गीय एटी पवार हे 40 वर्षे आमदार होते. राज्यात माजी मंत्री राहिले आहेत, कदाचित त्यांच्या पुण्यामुळेच मी आज हा दिवस पाहत आहे. त्यांनी नेहमीच समाजसेवीची शिकवण दिलीय, लोकांची कामे जास्त प्रगल्भतेनं करा, हेच शिकवल्याचं डॉ. पवार यांनी म्हटलं. मी सुरुवातील जिल्हा परिषदेच्या आरोग्य समितीवर काम केलंय, स्थायी समितीवरही काम केलंय. आता खासदार आणि मंत्रीपदाची जबाबदारी मिळाली असून तेही काम निष्ठने करेन, असे पवार यांनी म्हटले. शिक्षण- एम.बी.बी.एस.
* जन्म दि.- १३ सप्टेंबर १९७८* जन्मगाव- नरूळ, ता. कळवण (नाशिक)* माहेरचे नाव- डॉ. भारती किसन बागूल* प्राथमिक शिक्षण- मुंबई* माध्यमिक शिक्षण- नाशिक* आवड, निवड, छंद- समाजसेवा व वाचन
* राजकीय वाटचाल- पती प्रवीण अर्जुन पवार यांचे भक्कम पाठबळ लाभले, माजी मंत्री स्व. ए. टी. पवार यांच्या सहवासात राजकीय प्रवासाला सुरुवात. जि.प.च्या उमराणे, मानूर गटातून दोन वेळा विजयी, २०१४ मध्ये दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून पराभव, २०१९ मध्ये लोकसभा निवडणुकीत विजयी.* भविष्यातील वाटचाल- सामाजिक बांधिलकी जपत मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करणार* संकल्प- केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांचा वापर करून मतदारसंघाचा कायापालट करणार. पाणी, रस्ते, वीज यासह मूलभूत सुविधांसाठी शासन दरबारी सतत पाठपुरावा करणार.