नवी दिल्ली - सध्या हिट अँड रनचे राजकारण चालू आहे. चिखल फेका आणी पळून जावा अशी आताच्या राजकारणी लोकांची स्थिती आहे. पण तुम्ही आमच्यावर जेवढा चिखल फेकाल तेवढं कमळ फुलेल असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना लगवला. राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला पंतप्रधान नरेंद्र मोदी आज लोकसभेत उत्तर देत होते. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांना खडे बोल सुनावले. मोदींचे तब्बल दीड तास भाषण झाले त्यावेळी विरोधकांची घोषणाबाजी सुरुच होती. दुसरीकडे पंतप्रधान मोदींनी देखील तितक्याच जोशात आपलं भाषण पूर्ण केलं.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसच्या कार्यकाळावर घणाघाती टिका केली. यावेळी ते म्हणाले की, 'देशाला लोकशाही काँग्रेसनं किंवा नेहरुंनी दिलेली नाही. लोकशाही ही आमच्या रक्तात आहे, आमची परंपरा आहे. तुम्ही लोकशाहीच्या गप्पा मारता? तुमचे पंतप्रधान राजीव गांधींनी हैदराबाद विमानतळावर आपल्याच पक्षाच्या दलित मुख्यमंत्र्यांना सर्वांसमोर अपमानित केलं होतं', ही आठवण नरेंद्र मोदींनी काँग्रेसला करुन दिली. 'आम्हाला तुम्ही लोकशाही शिकवू नका. तुम्हाला ते शोभून दिसत नाही. सरदार वल्लभभाई पटेल जर देशाचे पहिले पंतप्रधान असते, त संपूर्ण काश्मीर आपलं असतं. आपल्यानंतर स्वातंत्र्य झालेल्या अनेक देशांनी प्रगती केली आहे हे मान्य करा', असं नरेंद्र मोदी लोकसभेत म्हणाले. पुढे बोलताना ते म्हणाले की, ज्यावेळी भारता डोकलाममध्ये युद्ध करत होता. त्यावेळी तुम्ही चीनच्या लोकांसोबत भेटण्यात व्यस्त होतात.
'आवाज दाबण्याचा जो प्रयत्न होतोय, तो यशस्वी होणार नाही याची मला खात्री आहे. काँग्रेसने पसरवलेल्या विषाची किंमत सर्व देशवासीयांना चुकवावी लागतेय. आज हा देश ज्या ठिकाणी आहे, त्यात आजवरच्या सर्व सरकारांचं योगदान असल्याचं मी लाल किल्ल्यावरून म्हटलं. हे सौजन्य काँग्रेसच्या एकाही नेत्यानं दाखवलं नाही', असा टोला मोदींनी लगावला.
मोदींच्या भाषणावेळी विरोधकांच्या घोषणा - पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेत बोलत आसताना विरोधकांनी गदारोळ केला. 15 लाखांच्या घोषणेचं काय झालं? अशी घोषणाबाजी करत विरोधकांनी मोदींना घेरण्याचा प्रयत्न केला. तब्बल दीड तास विरोधकांची घोषणाबाजी सुरु होती. ‘क्या हुआ, क्या हुआ, 15 लाख का क्या हुआ?, नही चलेगी, नही चलेगी जुमलेबाजी नही चलेगी...’ या घोषणांनी विरोधकांनी अक्षरश: सभागृह दणाणून सोडलं. आंध्रप्रदेशला अर्थसंकल्पात कमी निधी दिल्यामुळे विरोधकांसह टीडीपीच्या खासदारांनी मोदींविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.