गेल्या तीन दिवसांपासून दिल्ली पाण्याखाली आहे. यमुनेला पूर आल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे. यामुळे पिण्याच्या पाण्यावर प्रक्रिया करणारी यंत्रणा पाण्याखाली गेली असून दिल्लीला पाण्यात असतानाही २५ टक्के भागाला पिण्याच्या पाण्याशिवाय रहावे लागणार आहे. महत्वाचे म्हणजे दिल्लीत पाऊस एवढा न कोसळूनही पुराच्या पाण्यात रहावे लागत आहे.
दिल्लीतून वाहणाऱ्या पाण्याने 208.62 मीटरपेक्षा उंची गाठली होती. परंतू, सकाळपासून दिल्लीचे पाणी वाढले नाही. हा स्तर बराच वेळ कायम राहिला होता. यामुळे दिल्लीतील पाणी आता ओसरू लागण्याचा अंदाज केंद्रीय जल आयोगाने लावला आहे. दिल्लीत यमुनेचा जलस्तर स्थिर झाला आहे. यामुळे आज रात्रीपासून पाणी ओसरण्यास सुरुवात होईल असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हटले आहे.
संचालक शरद चंद्र यांनी सांगितले की, यमुनेच्या पाण्याची पातळी स्थिर झाली असून येत्या चार तासांत ती कमी होण्यास सुरुवात होईल. शुक्रवारी पहाटे 3 वाजेपर्यंत ते 208.45 मीटरपर्यंत खाली येणे अपेक्षित आहे. ते म्हणाले की, हरियाणातील हथिनीकुंड बॅरेजमधील पाण्याचा प्रवाह दुपारी 4 वाजता 80,000 क्युसेकवर घसरला आहे.
आताच हाती आलेल्या अपडेटनुसार दिल्लीत यमुना नदीच्या पाण्याची पातळी कमी झाली आहे. रात्री 10 वाजता पाणी 208.63 मीटरवर पोहोचले आहे. दिल्लीत गेल्या २४ तासांत यमुना नदीच्या पाण्याच्या पातळीत कोणतीही वाढ झालेली नाही. सायंकाळी 6 वाजता 208.66 मीटर एवढी पाणीपातळी नोंदवली गेली, तीच रात्री 8 वाजता कायम राहिली. दिल्लीकरांसाठी ही एक दिलासादायक बातमी आहे. रात्रीनंतर पाण्याची पातळी 15 ते 25 सेंटीमीटरने कमी होण्याची शक्यता आहे.