श्रीनगर - जम्मू काश्मीरमधील सोपोर येथे सुरक्षादलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. या चकमकीदरम्यान जवानांना दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश आले आहे. सध्या परिसरात शोध मोहीम सुरू आहे. सोपोरमधील द्रुसु गावात दोन दहशतवादी लपून बसल्याची माहिती जवानांना गुरुवारी रात्री (2 ऑगस्ट) मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार जवानांनी रात्री उशिरा परिसराला घेराव घालत शोध मोहीम सुरू केली. यादरम्यान, शुक्रवारी (3 ऑगस्ट) सकाळी दहशतवाद्यांनी जवानांवर हल्ला केला. यानंतर जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली. यावेळी जवानांनी दोन्ही दहशतवाद्यांना कंठस्नान घातले.
(नोकरी सोडा नाहीतर मरायला तयार राहा, काश्मीरमध्ये घरात घुसून दहशतवाद्यांची धमकी)
मिळालेल्या माहितीनुसार, द्रुसु गावात लपून बसलेल्या दहशतवाद्यांपैकी एक जण पुलवामा आणि दुसरा सोपोरमधील रहिवासी होता. यातील एक दहशतवादी हा काही दिवसांपूर्वी पुलवामा येथून अचानक बेपत्ता झालेला तरुण असल्याचं म्हटलं जात आहे. बेपत्ता झालेल्या या तरुणाला नातेवाईकांनी व्हिडीओद्वारे दहशतवादाचा मार्ग सोडून घरी परण्याचे आवाहन केले होते.
दरम्यान, गुरुवारीदेखील कुपवाडा येथील लोलाब येथे लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत लष्कराने दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले होते. जम्मू काश्मीर पोलीस दलाचे डीजीपी एसपी वैद यांनी ट्विट करून या चकमकीबाबत माहिती दिली होती. "कुपवाडामधील लोलाब परिसरात लष्कर आणि जम्मू काश्मीर पोलिसांच्या जवानांसोबत झालेल्या चकमकीदरम्यान दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात आले आहे, " असे ट्विट एसपी वैद यांनी केले होते.