रायपूर : आदिवासी हक्क कार्यकर्त्या सोनी सोरी यांच्यावरील अॅसिड हल्ला हे पंतप्रधान मोदी यांच्या भेटीच्या वेळी सनसनाटी निर्माण करण्यासाठी मुद्दाम घडवून आणलेले नाटक आहे, या जिल्हाधिकारी अमित कटारिया यांनी फेसबुकवर टाकलेल्या पोस्टमुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे.सोरींवरील हल्ला केवळ एक नाटक होते, असे या पोस्टमध्ये म्हटले आहे. या पोस्टवर तीव्र प्रतिक्रिया उमटल्यानंतर हे माझे वैयक्तिक मत असल्याचेही कटारिया यांनी रविवारी स्पष्ट केले.ही वादग्रस्त पोस्ट मुळात आयआयटी कानपूर येथे शिकलेले आणि पंतप्रधान ग्रामविकास कार्यक्रमाचे अरीब अहमद यांनी लिहिली होती. सोरी प्रकरणाच्या तपासाशी संबंधित गोपनीय कागद अरीब यांच्याकडे कसे पोहोचले, असे विचारले असता जिल्हाधिकारी कटारिया समाधानकारक उत्तर देऊ शकले नाहीत. अरीब यांनी लिहिलेली पोस्ट कटारिया यांनी शुक्रवारी रात्री शेअर केली होती. याला ६०० पेक्षा अधिक लाईक व ४३ वर कॉमेंट आल्या होत्या. बाहेरचे लोक बस्तरबाबत खोट्या बातम्या पेरत असल्याचे यात म्हटले होते. सोरी यांच्यावरील हल्ला आश्चर्यकारक आहे. कारण हल्ला होतो ना होतो, तोच त्याची माहिती मीडियाकडे पोहोचली. सोरींवर ज्या दिवशी हल्ला झाला, त्याच्या दुसऱ्या दिवशी पंतप्रधान छत्तीसगडच्या दौऱ्यावर येणार होते. अशा स्थितीत ही संपूर्ण घटना पूर्वनियोजित वाटते, असेही या पोस्टमध्ये म्हटले आहे.यापूर्वी गॉगल लावून पंतप्रधान मोदींचे स्वागत करून प्रोटोकॉलचा भंग केल्यामुळे जिल्हाधिकारी कटारिया चर्चेत आले होते.
सोरींवरील अॅसिड हल्ला घडवून आणलेले नाटक
By admin | Published: February 29, 2016 3:04 AM