कोलकाता : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्याआधी राजकीय वातावरण तापले आहे. नरेंद्र मोदींचा शपथविधी समारंभ ३० मे रोजी पार पडणार आहे. या शपथविधी सोहळ्याला पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी उपस्थित राहणार होत्या. मात्र, त्यांनी आता यू-टर्न घेतला असून या शपथविधी सोहळ्याला हजेरी लावणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
ममता बॅनर्जी यांनी नरेंद्र मोदींना पत्रातून शुभेच्छा दिल्या आहेत. तुमचे संविधानिक आमंत्रण स्वीकारले होते आणि यासाठी येण्याची तयारी सुद्धा केली होती. मात्र, गेल्या काही वेळात रिपोर्ट्स पाहिले. यात भाजपाच्या 54 कार्यकर्त्यांच्या परिवाराला आमंत्रित करण्यात आले आहे, ज्यांची राजकीय हत्या करण्यात आल्याचे भाजपाकडून सांगण्यात येत आहे. परंतु हे सर्व चुकीचे आहे. बंगालमध्ये कोणाचीही राजकीय हेतूने हत्या झालेली नाही. या हत्या एकमेकांच्या वादातून, कौटुंबिक भांडण आणि इतर कारणांमुळे झाल्या आहेत. याचा राजकारणाशी काहीही संबंध नाही, असे ममता बॅनर्जी यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.
दरम्यान, नरेंद्र मोदी देशाच्या पंतप्रधानपदी दुसऱ्यांदा विराजमान होणार आहे. मोदींच्या शपथविधी सोहळ्यासाठी जगभरातील नामवंत लोकांना आमंत्रित करण्यात येत आहे. विशेष म्हणजे या सोहळ्यासाठी पश्चिम बंगालमध्ये लोकसभा निवडणुकीदरम्यान ठार झालेल्या कार्यकर्त्यांच्या नातेवाईकांना देखील आमंत्रित करण्यात आले आहे.
पश्चिम बंगालमध्ये राजकिय हिंसेतून हत्या झालेल्या भारतीय जनता पक्षाच्या नातलगांचा यामध्ये समावेश आहे. या लोकांच्या राहण्याची आणि जेवनाची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. यावेळी बंगालमधील हिंसेत ठार झालेल्या मनू यांच्या मुलाने दिल्लीला जाण्यापूर्वी प्रतिक्रिया दिली. तृणमूल काँग्रेसच्या गुंडांनी माझ्या वडिलांना ठार केले. आम्हाला आनंद आहे की, आम्ही दिल्लीला जात आहोत. आता आमच्या परिसरात शांतता असल्याचे मनू यांच्या मुलाने सांगितले. मनू हे भाजपचे कार्यकर्ते होते.