आयएएस बनण्याचं स्वप्न उराशी बाळगून दिल्लीत अभ्यास करण्यासाठी येत असलेल्या विद्यार्थ्यांना सहन कराव्या लागत असलेल्या हालअपेष्टांबाबतची धक्कादायक माहिती मागच्या काही दिवसांपासून समोर येत आहे. काही दिवसांपूर्वी एका विद्यार्थ्याचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला होता. त्यानंतर ओल्ड राजेंद्रनगर येथे यूपीएससी कोचिंग सेंटरच्या बेसमेंटमध्ये पाणी भरून ३ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, आता आयएएसची तयारी करत असलेल्या महाराष्ट्रातील एका तरुणीनं दिल्लीत आपलं जीवन संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
ओल्ड राजेंद्रनगर येथे आयएएस परीक्षेची तयारी करत असलेल्या एका तरुणीने गळफास घेऊन जीवन संपवलं. अंजली असं या तरुणीचं नाव असून, ती महाराष्ट्रातील रहिवासी आहे. मृत्यूला कवटाळण्यापूर्वी तिने लिहिलेली तीन पानांची सुसाईड नोट समोर आली आहे. त्यामध्ये तिने हॉस्टेल आणि पेईंग गेस्ट वाल्यांकडून होत असलेल्या लुटमारीचा उल्लेख केला आहे.
तणावामुळे अंजली हिने जीवन संपवल्याचं संगण्यात येत आहे. अंजलीच्या सुसाईड नोटमधून विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या त्रासाचा उल्लेख करण्यात आला आहे. या त्रासामुळे ओल्ड राजेंद्रनगरमध्ये राहत असलेले विद्यार्थी खूप तणावाखाली असल्याचे सुसाइड नोटमध्ये म्हटले आहे. अंजली हिने लिहिलं की, ओल्ड राजेंद्रनगरमध्ये हॉस्टेल आणि पीजीचे भाडे अधिक असल्याने खूप अडचणीचा सामना करावा लागतो. हे हॉस्टेल आणि पीजीवाले मिळून विद्यार्थ्यांची लूट करत आहेत, असा आरोप तिने केला.
मिळालेल्या माहितीनुसार अंजली ज्या खोलीमध्ये राहायची तिचं भाडं १५ हजार रुपये एवढं होतं. अंजली हिने ११ जुलै रोजी तिची मैत्रिण श्वेता हिच्यासोबत व्हॉट्सअॅपवरून चॅटिंग करताना खोलीच्या भाड्यामध्ये करण्यात आलेल्या वाढीचा उल्लेख केला होता. दरम्यान, श्वेता संध्याकाळी जेव्हा रूमवर आली. तेव्हा अंजली गळफास घेतलेल्या स्थितीमध्ये आढळून आली. श्वेताने सांगितले की, २१ जुलै रोजी आम्ही तिला शोधत होतो, मात्र रात्री ८ वाजता जेव्हा तिच्या सोबत राहणारी तरुणी आली आणि तिने खोलीचा दरवाजा उघडला, तेव्हा अंजलीने गळफास घेतल्याचं समोर आलं. श्वेता ही सुद्धा त्याच बिल्डिंगच्या बेसमेंटमध्ये १२ हजार रुपये भाडं देऊन राहते. दरम्यान, या प्रकरणाची चौकशी सुरू असून, जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे सांगितले.