नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यक्रमात अचानक किरकोळ धमाक्याचा आवाज आला. त्यामुळे मोदींच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या सुरक्षारक्षकांची तारांबळ उडाली. या अधिकाऱ्यांनी घटनेचा तात्काळ तपास सुरु केला. त्यावेळी, अचानकपणे कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आल्याने तेथे लावलेल्या एका मशिनमधून हा हलकासा आवाज आल्याचे निष्पन्न झाले.
दिल्लीतील भारतीय पुरातत्व सर्व्हेक्षण विभागाच्या 'धरोहर भवन' या नवीन इमारतीचे मोदींच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमात मोदींनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यानंतर व्यासपीठावरुन खाली येऊन तेथील वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यावेळी तेथील एका एसी मशिनमध्ये धमाक्याचा आवाज झाला. धमाक्याचा हा आवाज ऐकताच तेथे उपस्थित सर्वच लोकांमध्ये घबराट पसरली. त्यामुळे मोदींच्या सुरक्षा रक्षकांनी तात्काळ पोझिशन घेत तपास सुरु केला. मात्र, हा एका एसी मशिनचा आवाज असल्याचे तपासाअंती पुढे आले. एसी मशिनला जोडण्यात आलेला पाईप तुटल्याने हा आवाज झाला होता. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काही विशेष अधिकाऱ्यांची बैठक व्यवस्था असलेल्या ठिकाणीच ही मशिन ठेवण्यात आली होती.