नवी दिल्ली : लेफ्टनंट जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी आज लष्कर उपप्रमुखपदाची सूत्रे स्वीकारली. विद्यमान लष्करप्रमुख बिपीन रावत ३१ डिसेंबरला सेवानिवृत्त होणार असून त्यानंतर वरिष्ठ कमांडंट या नात्याने पदाच्या शर्यतीत नरवणे आघाडीवर असणार आहेत.लेफ्टनंट जनरल डी.अंबू शनिवारी लष्कर उपप्रमुख या पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत.
मूळचे पुण्याचे असलेले नरवणे यांची यापदावर नियुक्ती झाली आहे. लष्कराच्या पूर्वेकडील कमांडचे प्रमुख म्हणून मनोज नरवणे चार हजार किलोमीटरच्या भारत-चीन सीमेवर तैनात होते. ३७ वर्षांच्या सेवेत त्यांनी अनेक कमांडचे नेतृत्व केले आहे. जम्मू-काश्मीर आणि पूर्वेकडील दहशतवादी कारवायांच्या विरोधात त्यांनी लढा दिला आहे. जम्मू-काश्मीरमध्ये राष्ट्रीय रायफल्सचे एक बटालीयन व पूर्वेकडील इन्फ्रंट्री ब्रिगेडमध्येही त्यांनी महत्त्वाच्या पदांवर जबाबदारी सांभाळली आहे. श्रीलंकेतील शांती मिशन दलामध्येही त्यांचा सहभाग होता. म्यानमार येथे भारतीय दुतावासात तीन वर्षे सेवा दिली आहे. नॅशनल डिफेन्स अॅकेडमी व भारतीय सेना अॅकेडमीचे ते माजी विद्यार्थी आहेत. जून १९८०मध्ये शिख लाईट इन्फ्रंट्री रेजीमेंटच्या सातव्या बटालीयनमध्ये त्यांचे पहिले पोस्टींग होते.