संजय शर्मा, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली ( Marathi News ): २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत ३५० जागांपेक्षा जास्त जागा जिंकण्याचे लक्ष्य प्राप्त करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सूत्रे हाती घेतली आहेत. लोकसभेच्या एकेक जागेसाठी व्यूहरचना तयार केली जात आहे. प्रत्येक जागेसाठी प्रभारी व तीन-चार जागांचे क्लस्टर करून प्रत्येक क्लस्टरच्या प्रभारीची भाजप नियुक्ती करणार आहे.
काँग्रेस व विरोधी पक्ष इंडिया आघाडीचा नेता कोण असेल, जागावाटप कसे असेल, या मुद्यांवर चर्चा करीत असताना भाजपने पाच राज्यांतील निवडणुका संपताच व तीन राज्यांतील सरकारचे गठण पूर्णपणे झालेले नसतानाच संपूर्ण पक्ष व संपूर्ण संघटनेला मिशन २०२४ साठी सज्ज केले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या देखरेखीखाली प्रत्येक दिवशी २०२४ ची तयारी सुरू आहे.
सन २०२२-२३ डिसेंबर रोजी दिल्लीत झालेल्या भाजप राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या उच्चस्तरीय बैठकीत २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा झाली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह व भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी मंगळवारी पश्चिम बंगालच्या ३२ जागांच्या तयारीसाठी कोलकाता येथे बैठक घेतली.
प्रत्येक लोकसभा जागेसाठी प्रभारी नेमणार
पुढील दोन-तीन दिवसांत राजधानी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली एक उच्चस्तरीय बैठक होईल. यात भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा, केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह सहभागी होणार आहेत. या बैठकीत देशातील एकेक जागा जिंकण्यासाठी भाजप प्रभारी नियुक्त करणार आहे. तीन ते चार लोकसभा जागांचे क्लस्टर करून प्रत्येक क्लस्टरचे प्रभारी नियुक्त करण्यात येणार आहेत. प्रत्येक क्लस्टरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, जे.पी. नड्डा, राजनाथ सिंह यांचे नवीन वर्षापासून दौरे सुरू होणार आहेत. देशात सुमारे १०० क्लस्टर होतील. तेथे चार नेते दौरे करणार आहेत. प्रत्येक नेत्याकडे २५ क्लस्टरची जबाबदारी येईल.
नव मतदारांना जोडण्याची जबाबदारी युवा मोर्चाकडे
नवीन मतदारांना जोडण्याची जबाबदारी भारतीय जनता युवा मोर्चाकडे देण्यात आली आहे. युवा मोर्चा व महिला मोर्चा प्रत्येक राज्याच्या प्रत्येक लोकसभा मतदारसंघात नवीन मतदार संमेलने अयोजित करतील.