नवी दिल्ली-
बुलडोजर अॅक्शनबाबत संपूर्ण देशभर चर्चा होत असताना दक्षिण दिल्ली पालिकेचे महापौर मुकेश सुर्यन यांनी मोठा दावा केला आहे. येणाऱ्या काळात शाहीन बाग, सरिता विहार आणि कालिंदी कुंज येथेही बुलडोजर चालवला जाईल. कारण याही ठिकाणी बऱ्याच जागी अवैधरित्या कब्जा करण्यात आलेला आहे.
'आजतक' या वृत्त समूहाला दिलेल्या माहितीत महापौर मुकेश सुर्यन यांनी महत्वाची माहिती दिली आहे. शाहीन बागमध्ये सरकारी जागांवर अतिक्रमण करण्यात आलं आहे. सरिता विहार, कालिंदी कुंजमध्येही लोकांनी अवैध कब्जा केला आहे.
"आम्ही दिल्लीत अतिक्रमण विरोधी मोठं अभियान हाती घेतलं आहे. दिल्लीत रोहिंग्या व बांगलादेशींनी बऱ्याच ठिकाणी अवैधरित्या कब्जा केला आहे. शाहीनबागमध्ये सरकारी जागांवर अतिक्रमण करण्यात आलेलं आहे. सरिता विहार, कालिंदी कुंजमध्ये लोकांनी कॉलोनींना खेटून अवैध कब्जा केला आहे", असं सुर्यन कुमार म्हणाले.
दक्षिण दिल्लीमध्ये सर्व्हे करण्यात आल्याचीही माहिती त्यांनी दिली. त्याचा अहवाल समोर आला असून जे जे अवैध आहे त्यावर कारवाई केली जाईल असंही ते म्हणाले.
दिल्ली सरकारवर निशाणामुकेश सुर्यन यांनी यावेळी आम आदमी आण त्याआदीच्या काँग्रेस सरकारवर जोरदार टीका केली. गेल्या ७० वर्षांत काँग्रेस आणि ७ वर्षात आम आदमी पक्षानं कधीच दिल्लीकरांचा विचार केला नाही, असं सुर्यन म्हणाले.
याआधीच्या सरकारनं दिल्लीत केवळ घुसखोर आणि बांगलादेशींना आणण्याचं काम केलं. पण दिल्लीच्या नागरिकांची चिंता कुणीच केली नाही. दिल्लीत जनता आज पाण्याच्या समस्येचा सामना करत आहे. पण आम आदमीचं सरकार आज रोहिंग्यांना पाणी पुरवत आहे. दिल्ली सरकार रोहिंग्यांना नाइट शेल्टर्समध्ये वसविण्याचं काम करत आहे आणि त्यांच्या जेवणाचीही व्यवस्था करत आहे, असा आरोप सुर्यन यांनी केला आहे.