कर्नाटक विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहे. काँग्रेसनं तब्बल १३६ जागांवर विजय मिळत बहुमताचा जादुई आकडाही गाठला आहे. तर भाजपला ६५ जागांवर आणि जेडीएसला १९ जागांवर विजय मिळाला. दरम्यान, या विजयानंतर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
“हा एक मोठा विजय आहे. आम्हाच्यावर भाजप टीका करत होती की आम्ही काँग्रेसमुक्त भारत बनवू. परंतु आता भाजपमुक्त दक्षिण भारत झालाय हे सत्य आहे,” असं खर्गे म्हणाले. तुम्हाला सर्वांना असंच एकजुट व्हावं लागेल. तेव्हाच आपण ही लढाई जिंकू आणि तेव्हाच देश वाचवता येईल. जर लोकशाहीचं सरकार हवं असेल तर आपल्याला आणखी मोठी लढाई जिंकावी लागणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.“अधिक काळ गर्व राहत नाही. ही लोकशाही आहे आणि आपल्याला लोकांचं ऐकावं लागेल. जे आपल्याला मार्ग दाखवतात त्यांच्यासमोर झुकावं लागेल. हा कोणा एकाचा विजय नाही, राज्याच्या जनतेचा विजय आहे. त्यांनी निर्णय घेतला आणि निवडलंय. यासाठी आम्हाला १३६ जागा मिळाल्या. ३६ वर्षांनंतरचा हा मोठा विजय आहे,” असंही खर्गेंनी नमूद केलं.
निकालावर नड्डांचंही भाष्य
“भाजप कर्नाटकाच्या जनतेचा जनादेश नम्रतेनं स्वीकार करत आहे. कर्नाटकातील भाजपच्या मेहनती कार्यकर्त्यांना त्यांच्या प्रयत्नांसाठी आणि आमच्यावर विश्वास दाखवण्यासाठी धन्यवाद देतो. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजप लोकांसाठी काम करत राहिल. तसंच सक्रियरित्या विरोधीपक्षाची भूमिका पार पाडेल,” असं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा म्हणाले.