'दक्षिणेतील लोक आफ्रिकन दिसतात'; सॅम पित्रोदांच्या विधानावर काँग्रेस म्हणतं, 'त्यांनी दिलेली उपमा...'
By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2024 01:47 PM2024-05-08T13:47:19+5:302024-05-08T15:00:22+5:30
काँग्रेस नेते सॅम पित्रोदा यांनी भारतीयांच्या दिसण्यावरुन एक वादग्रस्त विधान केलं आहे.
Sam Pitroda : काँग्रेस नेते सॅम पित्रोदा यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य करुन पुन्हा एकदा पक्षाला अडचणीत आणलं आहे. सॅम पित्रोदा यांनी लोकसभा निवडणुकीदरम्यान वारसा कराविषयी धक्कादायक विधान केलं होतं. त्यांच्या वक्तव्यावरुन पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसला चांगलेच धारेवर धरलं होतं. मात्र आता पुन्हा एकदा पित्रोदा यांनी माध्यमांशी बोलताना भारतीयांच्या दिसण्याबाबत आक्षेपार्ह टिप्पणी केलीय. भारताच्या विविधतेबद्दल बोलताना सॅम पित्रोदा यांच्या अशा कमेंटमुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे पक्षाने त्यांच्या या विधानाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
ईशान्य भारतातील लोक चिनीसारखे दिसतात. दक्षिण भारतीय हे आफ्रिकन लोकांसारखे आहेत आणि उत्तर भारतीय काहीसे गोरे आहेत, असं धक्कादायक विधान इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा यांनी केलं आहे. "आतापर्यंत जशी विविधतेत एकता आहे तशीच आपण टिकवून ठेवू शकतो. गेल्या ७५ वर्षात प्रत्येकाला जगता येईल असे चांगले वातावरण आपण निर्माण केले आहे. भारतासारख्या वैविध्यपूर्ण देशाला आपण एकत्र ठेवू शकतो. पूर्व भारतातील लोक चीनसारखे दिसतात. पश्चिमेकडील लोक अरबांसारखे दिसतात, उत्तरेकडील लोक गोरे दिसतात आणि दक्षिण भारतीय आफ्रिकनसारखे दिसतात. काही फरक पडत नाही. आपण सर्व एक भाऊ-बहिण आहेत," असं सॅम पित्रोदा यांनी म्हटलं.
काँग्रेसने दिलं स्पष्टीकरण
"सॅम पित्रोदा यांनी भारतातील विविधतेला दिलेली उपमा अत्यंत चुकीची आणि अस्वीकार्य आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस स्वतःला या वक्तव्यापासून पूर्णपणे अलिप्त ठेवते," असे जयराम रमेश यांनी म्हटलं आहे.