कर्नाटकात काँग्रेसनं भाजपला धुळ चारली आहे. गेल्या अनेक वर्षांची परंपरा कर्नाटकच्या जनतेनं कायम ठेवत यावेळी काँग्रेसच्या बाजूनं कौल दिलाय. काँग्रेसच्या या यशानंतर चित्रपट अभिनेते कमल हासन यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यासाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे. तसंच विजयाबद्दल त्यांनी राहुल गांधी यांचं अभिनंदन केलं.
“गांधीजींप्रमाणे तुम्ही लोकांच्या हृदयात स्थान मिळवलं आणि जसं त्यांनी केलं त्याप्रमाणे तुम्ही सौम्य पद्धतीनं जगातील शक्तींना प्रेम आणि नम्रतेनं हादरा देऊ शकता हे दाखवून दिलं. तुमचा विश्वासार्ह दृष्टीकोन, धाडसीपणा यामुळे लोकांना मोकळा श्वास घेता येणार आहे. विभाजनवाद नाकारण्यासाठी तुम्ही कर्नाटकच्या जनतेवर विश्वास ठेवला आणि त्यांनी तुमच्यावर विश्वार ठेवून एकजुटीनं प्रत्युत्तर दिलं. केवळ विजयासाठीच नाही, तर विजयाच्या पद्धतीसाठीही तुमचं अभिनंदन,” असं ट्वीट कमल हासन यांनी केलं. यासोबत त्यांनी त्यांचा आणि राहुल गांधी यांचा फोटो शेअर केलाय.
काय म्हणाले राहुल गांधी?
“कर्नाटक निवडणुकीत एकीकडे भांडवलदारांची ताकद होती. तर दुसरीकडे गरीब जनतेची ताकद होती. जनतेच्या शक्तीनं ताकदीचा पराभव केला. हेच आता प्रत्येक राज्यात होईल. काँग्रेस कर्नाटकात गरीबांसोबत उभी राहिली. आम्ही गरीबांच्या मुद्द्यावर लढलो. आम्ही द्वेषानं, चुकीच्या शब्दांचा वापर करून ही लढाई लढलो नाही,” असं राहुल गांधी म्हणाले.
“आम्ही प्रेमानं ही लढाई लढलो. हा देशाला प्रेमच आवडतं हे कर्नाटकानं दाखवून दिलं. कर्नाटकात आता द्वेषाचा बाजार बंद झालाय आणि प्रेमाची दुकानं खुली झाली आहेत. हा सर्वांचा विजय आहे. सर्वप्रथम हा कर्नाटकातील जनतेचा विजय आहे. आम्ही कर्नाटकातील जनतेला ५ आश्वासनं दिली होती. आम्ही ती पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत पूर्ण करू” असंही त्यांनी स्पष्ट केल.