ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २४ - अल्पसंख्यांकाना खुश करण्यासाठी 'टिपू सुलतानची' जयंती साजरी करणा-या कर्नाटक सरकारवर कडाडून हल्ला चढवतानाच 'लाखो लोकांना जबरदस्तीने धर्मांतर करण्यास भाग पाडणारा टिपू सुलतान म्हणजे दक्षिणेकडील औरंगजेब असल्याची टीका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या 'पांचजन्य'मधील लेखात करण्यात आली आहे. टिपूचे व्यक्तिमत्व वादग्रस्त असल्याचेही लेखात म्हटले आहे.
टिपू सुलतान हा धर्मनिरपेक्ष नव्हे तर असहिष्णू व अत्याचारी होता, असा दावा हिंदू संघटना करत आहेत. तो दक्षिणेकडील औरंगजेब होता. त्याने लाखो जणांचे जबरदस्तीने धर्मांतर केले तसेच कित्येक लाखो मंदिरेही उध्वस्त केली‘, असा आरोप लेखात करण्यात आला आहे. केवळ राजकीय हेतूनेच सिद्धरामय्या सरकारने टिपूची जयंती साजरी केल्याचे सांगत लेखातून कर्नाटक सरकारवर निशाणा साधला आहे.