नवी दिल्ली - काश्मिरी जनतेला स्वातंत्र्य हवे आहे, असे वक्तव्य करणारे काँग्रेस नेते सैफुद्दीन सोझ यांच्यावर भाजपा आणि शिवसेनेच्या नेत्यांनी टीका केली आहे. सोझ यांना मुशर्रफ एवढाच पुळका आला असेल तर त्यांचे तिकीट काढून त्यांना पाकिस्तानमध्ये जावे, असे भाजपा नेते सुब्रह्मण्यम स्वामी यांनी म्हटले आहे. तर सोझ यांना मुशर्रफ आणि पाकिस्तान एवढेच चांगले वाटत असतील त्यांनी पाकिस्तानात जावे, असा सल्ला शिवसेनेच्या प्रवक्त्या मनिषा कायंदे यांनी दिला आहे. स्वातंत्र्य मिळवणे ही काश्मीरमधील जनतेची पहिली प्राथमिकता आहे, सद्यस्थितीत काश्मीरशी जोडल्या गेलेल्या देशांमुळे काश्मीरला स्वातंत्र्य मिळणे शक्य नाही. मात्र काश्मीरचे पाकिस्तानमध्ये विलीनीकरण करण्याची काश्मिरी जनतेची इच्छा नाही, असेही सोझ यांनी म्हटले होते. सोझ यांच्या या विधानावर भाजपा नेते सुब्रह्मण्यम स्वामी यांनी सडकून टीका केली." सोझ हे केंद्रात मंत्री असताना जेकेएलएफने त्यांच्या मुलीचे अपहरण केले होते. तेव्हा केंद्र सरकारनेच त्यांची मदत केली होती. मात्र अशा लोकांची मदत करण्याला काही अर्थ नाही. ज्याला भारतात राहायचे असेल त्याने संविधानाच्या चौकटीत राहावे, मुशर्रफ यांचा पुळका आला असेल तर त्यांच्यासाठी पाकिस्तानला जाणारे तिकीट द्यावे, असे स्वामी यांनी म्हटले.
सोझ यांनी पाकिस्तानात जावे, भाजपा आणि शिवसेनेची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2018 12:58 PM