Akhilesh Yadav UP Election Result : नुकतेच पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. पंजाब वगळवात सर्वच राज्यांमध्ये भाजपला यश मिळालं. उत्तर प्रदेशातही पुन्हा एकदा भाजपचं सरकार सत्तेत येणार आहे. या निवडणुकीच्या निकालावरुन समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. "निवडणुकीत झालेल्या गैरव्यवहारावर चर्चा होऊ नये यासाठी काश्मीर फाईल्स चित्रपट आणला गेला," असं ते म्हणाले. याशिवाय त्यांनी काही जागांचा उल्लेख करत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचाही आरोप केला.
सोमवारी आपलं क्षेत्रा आजमगढ येथे पोहोचलेल्या अखिलेश यादव यांनी माजी मंत्री दुर्गा यादव यांच्या निवासस्थानी माध्यमांशी संवाद साधला. "काश्मीर फाईल्समधून होणाऱ्या कमाईतून विस्थापितांसाठी काम केलं गेलं पाहिजे. यासाठी २५ लोकांची समिती स्थापन करण्यात यावी. तसंच जे पैसे जमा होत आहेत, ते कसे खर्च करावे हे त्या समितीनं ठरवावं. सरकारनंही पुढे यावं. संपूर्ण पैसा हा पंतप्रधानांच्या निधीत जाऊ नये. निरनिराळ्या ठिकाणी राहत असलेल्या लोकांशी चर्चा करून त्यांच्यावर तो पैसा खर्च करावा," असं अखिलेश यादव म्हणाले.
यावेळी त्यांनी निवडणुकीत गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला. "आपल्याला प्रशासनाशी लढायला हवं. मुरादाबाद येथे १ लाख ४७ हजार मतं मिळवणाऱ्याची मतमोजणी अडीच तास थांबवण्यात आली. यानंतर त्यांचा ७०० मतांनी पराभव झाल्याचं समजलं," असंही ते म्हणाले. यावेळी अखिलेश यांना ओवैसींबाबत प्रश्न विचारण्यात आला. "जो कोणी निवडणूक लढवेल त्याला काही ना काही मतं मिळतील. परंतु बसपा काय करत होती हा प्रश्न आहे. लोकशाही आणि संविधानाच्या मदतीनं आपला देश चालावा असं बाबासाहेब आंबेडकर यांचं स्वप्न होतं. बसपानं तर भाजपसोबतच हातमिळवणी केली," असा आरोपही त्यांनी केला.