लखनौ-
'यूपी में का बा' फेम गायिका नेहा सिंह राठोड हिला यूपी पोलिसांनी मंगळवारी नोटीस धाडली आहे. समाजवादी पक्षानं याप्रकरणी योगी सरकारवर निशाणा साधला आहे. भाजपा सरकारला आरसा दाखवणाऱ्या गालियाका नेहा सिंह राठोड हिला पोलिसांनी नोटीस धाडली आहे, भाजपा सरकारचा खरा चेहरा खूप कुरुप, क्रूर आणि सूड उगवणारा आहे, अशी टीका समाजवादी पक्षानं केली आहे.
यूपी पोलिसांनी गायिका नेहा सिंह राठोड हिला नोटीस पाठवली असून तिनं 'का बा सीजन-२' गाण्यातून समाजात तेढ निर्माण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. हे गाणं नुकतंच रिलीज झालं होतं. गाण्यातून कानपूरचं अग्निकांडवर भाष्य करण्यात आलं आहे. राठोड हिला पाठवण्यात आलेल्या नोटीसमध्ये सात प्रश्न विचारण्यात आलं आहेत. ज्याचं स्पष्टीकरण तीन दिवसांत देण्याचे आदेश दिले गेले आहेत.
'सपा'नं साधला निशाणा"काही दिवसांपूर्वी ब्राह्मण आई आणि मुलीला बुलडोजरनं उडवणाऱ्या, जीवंत जाळणाऱ्या भाजपा शासित सरकारनं काल विधानसभेत पत्रकारांना मारहाण केली. सपा आमदारांना मार्शलच्या करवी धक्काबुक्की केली गेली. अभद्र व्यवहार केला गेला. आज लोकगायिकेच्या घरी पोलिसांनी नोटीस धाडली आहे. नोटीस धाडणं हाच या सरकारचा खरा चेहरा आहे", असं ट्विट समाजवादी पक्षाकडून करण्यात आलं आहे.