लखनऊ: लोकसभा निवडणुकीसाठी उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टींनं आघाडी केली आहे. समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव आणि बहुजन समाज पार्टीच्यामायावतींनी एकत्रित पत्रकार परिषद घेत याबद्दलची घोषणा केली. या आघाडीत काँग्रेसला सामील करुन घेतलं जाईल, अशी चर्चा होती. मात्र भाजपाला आव्हान देण्यासाठी समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टी समर्थ असल्याचं मायावतींनी म्हटलं. मात्र तरीही या दोन पक्षांनी काँग्रेससाठी दोन जागा सोडल्यानं आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.उत्तर प्रदेशात लोकसभेच्या 80 जागा आहेत. यातील 38-38 जागा सपा-बसपा लढवणार आहेत. तर दोन जागा मित्रपक्षासाठी सोडण्यात आल्या आहेत. याशिवाय अमेठी आणि रायबरेली या काँग्रेसच्या बालेकिल्ल्यांमध्ये उमेदवार न देण्याचा निर्णय दोन्ही पक्षांनी घेतला. त्यामुळे उपस्थित पत्रकारांच्या भुवया उंचावल्या. याबद्दल प्रश्न विचारल्यावर मायावतींनी यामागील भूमिका स्पष्ट केली. 'काँग्रेस आमच्या आघाडीचा भाग नाही. मात्र तरीही रायबरेली आणि अमेठी मतदारसंघ त्यांना सोडण्याचा निर्णय आम्ही घेतला. काँग्रेस अध्यक्षांना भाजपानं या ठिकाणी अडकवून ठेऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला,' असं मायावती म्हणाल्या.
...म्हणून मायावतींनी दाखवली माया; राहुल गांधींसाठी सोडल्या दोन जागा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2019 2:42 PM