नवी दिल्ली : समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांनी आज (मंगळवारी) लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. अखिलेश यादव हे उत्तर प्रदेशातील आझमगड लोकसभा मतदारसंघातून खासदार होते. उत्तर प्रदेशात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत अखिलेश यादव हे मैनपुरीच्या करहल मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले आहेत.
माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव आज लोकसभेत पोहोचले. येथे त्यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांची भेट घेऊन आपला राजीनामा सोपवला. राष्ट्रीय राजकारणातून ते पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात सक्रीय होणार आहेत. अखिलेश यादव आता आमदार म्हणून उत्तर प्रदेशच्या राजकारणात सक्रीय राहणार आहेत.आता अखिलेश यादव विधानसभेचे सदस्य असताना विरोधकांची भूमिका ठामपणे पार पाडणार आहेत.
अखिलेश यादव यांच्यानंतर रामपूरचे खासदार आझम खान यांनीही लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. दरम्यान, अखिलेश यादव यांनी विधानसभा निवडणुकीत करहल मतदारसंघातून भाजपचे उमेदवार आणि केंद्रीय मंत्री एसपी सिंह बघेल यांचा 67,504 मतांच्या फरकाने पराभव केला. अखिलेश यादव यांना 1,48,196 मते मिळाली, तर एसपी सिंह बघेल यांना 80,692 मते मिळाली.
विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतरही अखिलेश यादव पराभव स्वीकारायला तयार नाहीत. भाजप सरकार आणि त्यांच्या धोरणांचा ते सातत्याने विरोध करत आहेत. अलीकडेच त्यांनी महागाईच्या मुद्द्यावरून भाजपवर निशाणा साधला आहे. दरम्यान, उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीत समाजवादी पार्टीला केवळ 111 जागा जिंकता आल्या. दुसरीकडे भाजपने स्वबळावर 255 जागा जिंकल्या. निवडणुकीत समाजवादी पार्टी आघाडीला 125 तर एनडीएला 273 जागा मिळाल्या.
विशेष म्हणजे आता उत्तर प्रदेशात मोठा विरोधी पक्ष म्हणून फक्त समाजवादी पार्टी आहे, कारण विधानसभा निवडणुकीत बसपा आणि काँग्रेसची कामगिरी अत्यंत खराब झाली आहे. बसपाला केवळ एक आणि काँग्रेसला दोन जागा मिळाल्या आहेत. उत्तर प्रदेश विधानसभेत या दोन्ही पक्षांचे प्रतिनिधित्व खूपच कमी आहे.
विधानसभा निवडणुकीत कोणाला किती जागा मिळाल्या?उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपला दुसऱ्यांदा जबरदस्त बहुमत मिळवून सत्तेत परतला आहे. भाजप आघाडीला 273 जागा मिळाल्या आहेत. समाजवादी पार्टीच्या नेतृत्वाखालील आघाडीला 125 जागा मिळाल्या आहेत. बसपा 1, काँग्रेस आणि जनसत्ता दलाच्या उमेदवारांनी प्रत्येकी 2 जागा जिंकल्या आहेत. 2017 मध्ये समाजवादी पक्षाने 52 जागा जिंकल्या होत्या.