वाराणसी - वाराणसीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांच्यासमोर आव्हान उभे करण्यासाठी सपा-बसपा महाआघाडीने मोठी खेळी खेळली आहे. सपा-बसपा महाआघाडीने वाराणसी येथील आपला उमेदवार बदलताना बीएसएफ जवान तेज बहादूर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. वाराणसी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिव स आहे. दरम्यान, आज तेज बहादूर आणि आणि आधीच्या उमेदवार शालिनी यादव यांनी समाजवादी पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मात्र नरेंद्र मोदींसमोर तेज बहादूर हेच उमेदवार असतील. तसेच शालिनी यादव या उमेदवारी अर्ज मागे घेतील, असे समाजवादी पक्षाने स्पष्ट केले आहे. या मतदारसंघात काँग्रेसने अजय राय यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे आता वाराणसीमध्ये नरेंद्र मोदी, अजय राय आणि तेज बहादूर असा तिरंगी मुकाबला होणार आहे.
हरयाणाचे रहिवासी असलेले तेज बहादूर यांनी वाराणसी मतदारसंघातून नरेंद्र मोदींविरोधात निवडणूक लढण्याची घोषणा केली होती. सुरुवातीला ते अपक्ष निवडणूक लढवणार होते. मात्र अखेरीस त्यांना समाजवादी पक्षाने आपल्याकडून उमेदवारी दिली आहे. 2017 मध्ये तेज बहाद्दूर यादव यांनी बीएसएफमध्ये दर्जाहीन जेवण देत असल्याचे काही व्हिडिओ सोशल मिडियावर टाकत सैन्य दलातील भ्रष्टाचार उघड केला होता. यावेळी ते भारत-पाकिस्तानच्या सीमेवर तैनात होते. मंडी मंदिर मुख्यालयातील 29 व्या बटालियनमध्ये ते कॉन्टेबल या पदावर होते. त्यांची नियुक्ती पूंछ जिल्ह्यातील खेत येथील एलओसीवर झाली होती. तेज बहादूर यांचे प्रकरण खूप गाजले होते. गेल्या वर्षी बीएसएफ जवान तेज बहाद्दूर यादव यांच्या व्हिडिओमुळे अधिकारी आणि सरकार संशयाच्या फेऱ्यात अडकलं होतं. बीएसएफ जवांनाना निकृष्ट दर्जाचे जेवण दिले जात असल्याची तक्रार तेज बहाद्दूर यांनी केली होती. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, आपला छळ सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला होता. त्यावर चौकशी केल्यानंतर, तेज बहादूर यांना बडतर्फ करण्यात आले होते. त्यानंतर जवानांना मिळणाऱ्या सापत्न वागणुकीची आणखीही काही प्रकरणं समोर आली होती. बहादूर यांच्याकडे दोन मोबाईल बाळगल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. तसेच सैन्याच्या गणवेशात असताना सोशल मिडियावर फोटो टाकल्याने सैन्याचे नियम तोडल्याचा आरोप ठेवत त्यांना बडतर्फ करण्यात आले होते.