Akhilesh Yadav News: दिल्ली विधानसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. दिल्लीत ७० जागांवर ५ फेब्रुवारीला मतदान होणार असून ८ फेब्रुवारीला निकाल जाहीर होणार आहे. इंडिया आघाडीचे घटक पक्ष असलेले आम आदमी पक्ष, काँग्रेस स्वतंत्रपणे निवडणुका लढवत आहे. तर भाजपा जोरदार कमबॅक करण्याच्या तयारीत आहे. दिल्ली निवडणुकीत काँग्रेस एका बाजूला पडली असून, इंडिया आघाडीत पक्षांनी आम आदमी पक्षाला समर्थन देण्यास सुरुवात केली आहे. समाजवादी पक्ष, तृणमूल काँग्रेस, ठाकरे गटाने अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला पाठिंबा जाहीर केला आहे. समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी आम आदमी पक्षाला पाठिंबा देण्याबाबतची भूमिका स्पष्ट करताना काँग्रेसला कानपिचक्या दिल्या आहेत.
दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला पाठिंबा देत आहोत, कारण आम आदमी पक्षाने महाराष्ट्राच्या निवडणुकीत आम्हाला पाठिंबा दिला होता. दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत ‘आप’ आणि काँग्रेस एकत्र लढले असते तर अधिक चांगला निकाल मिळवू शकले असते. इंडिया आघाडीचे नेतृत्व काँग्रेस करत आहे. मात्र, केजरीवाल यांच्या सारख्या नेत्यांच्या विरोधात ज्या प्रकारे प्रचार केला जात आहे, त्याच्याशी आम्ही सहमत नाही, अशी भूमिका ठाकरे गटाने स्पष्ट केली होती. यानंतर आता अखिलेश यादव यांनी आपल्या पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. काँग्रेस नाही, दिल्लीत ‘आप’ मजबूत म्हणून पाठीशी
दिल्ली विधानसभा निवडणुकीत समाजवादी पक्षाने आम आदमी पक्षाला दिलेल्या पाठिंब्याबाबत अखिलेश यादव यांनी पहिल्यांच भाष्य केले. इंडिया आघाडी तुटलेली नाही. इंडिया आघाडी आकारास येत होती, तेव्हा सांगण्यात आले होते की, स्थानिक पक्ष जिथे मजबूत आहेत, तिथे त्यांना इंडिया आघाडीकडून समर्थन मिळेल, जेणेकरून स्थानिक पक्ष आणखी मजबूत होतील. दिल्लीत अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष मजूबत आहे. म्हणूनच आम्ही आम आदमी पक्षाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच इंडिया आघाडीनेही आम आदमी पक्षाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे, असा सल्ला अखिलेश यादव यांनी दिला.
दिल्लीत भाजपाला केवळ आम आदमी पक्ष पराभूत करू शकतो
तृणमूल काँग्रेसचे नेते अभिषेक बॅनर्जी यांनी स्पष्ट केले की, इंडिया आघाडीची स्थापना झाली, तेव्हाच आम्ही ठरवले होते की, जिथे स्थानिक पक्ष मजबूत असेल, त्यांना भाजपाविरोधात उतरवायला हवे. दिल्लीत भाजपाला केवळ आम आदमी पक्ष पराभूत करू शकतो. त्यामुळेच आमचा आम आदमी पक्षाला पाठिंबा असेल, जो भाजपाला चितपट करू शकतो. आम्ही आम आदमी पक्षाला समर्थन न देऊन भाजपाची मदत का करू, असा सवालही बॅनर्जी यांनी विचारला.
दरम्यान, आम आदमी पक्ष, समाजवादी पक्ष, तृणमूल काँग्रेस हे सर्वच पक्ष काँग्रेस नेतृत्व करत असलेल्या इंडिया आघाडीचे घटक पक्ष आहेत. परंतु, दिल्ली विधानसभा निवडणुकीत या पक्षांनी काँग्रेसला पाठिंबा दिलेला नसून, हे सर्व पक्ष आम आदमी पक्षाच्या पाठीशी उभे राहिले आहेत. तत्पूर्वी, उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसने समाजवादी पक्षाला पाठिंबा दिला होता. मात्र, आता दिल्ली निवडणुकीत समाजवादी पक्ष काँग्रेसऐवजी आम आदमी पक्षाला पाठिंबा देत आहे.