रामपूर : हेट स्पीचप्रकरणी उत्तर प्रदेशमधील समाजवादी पार्टीचे आमदार व माजी मंत्री आझम खान यांना दोषी ठरविण्यात आले असून, ३ वर्षांचा तुरुंगवास आणि २५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. रामपूर येथील सत्र न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. या निर्णयानंतर आझम खान यांची आमदारकी धोक्यात आली आहे.
२०१९ मधील लोकसभा निवडणुकीदरम्यान रामपूर येथील एका प्रचारसभेत आझम खान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तत्कालीन रामपूर जिल्हाधिकाऱ्यांविरोधात आक्षेपार्ह टिपणी केली होती. त्यावेळी आयोगाच्या व्हिडीओ मॉनिटरिंग टीमचे प्रभारी अनिलकुमार चौहान यांनी स्थानिक पोलीस ठाण्यात दाखल केला होता. २१ ऑक्टोबरला ते सुनावणीस अनुपस्थित असल्यामुळे सुनावणी लांबणीवर पडली होती.
हेट स्पीचप्रकरणांमध्ये कठोर कारवाईबाबत सर्वोच्च न्यायालयाने गेल्या आठवड्यात निर्देश दिले होते. त्यानंतर न्यायालयाने आझम खान यांना शिक्षा ठोठावली. आझम खान यांना समाजवादी पार्टीमध्ये अध्यक्ष अखिलेश यादव यांच्याखालोखाल क्रमांक दोनचे नेते मानले जातात.
आमदारकी धोक्यात■ आमदार किंवा खासदारांना कोणत्याही प्रकरणात २ वर्षांहून अधिक शिक्षा झाल्यास त्यांचे सदस्यत्व रद्द होईल, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला होता.■ त्यामुळे आझम खान यांची आमदारकी धोक्यात आली आहे. आझम खान यांच्यावर विविध प्रकारचे ८० हून अधिक खटले दाखल आहेत.