काही दिवसांपूर्वी विवाहबाह्य संबंधातून झालेल्या एका हत्याकांडात पतीचा मृतदेह लपवण्यासाठी निळ्या ड्रमचा वापर केल्याचं उघड झाल्यापासून सोशल मीडियावर निळ्या ड्रमची खूप मोठ्या प्रमाणावर चर्चा होत आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशमधील लखनौ येथे आयोजित लंतरानी हास्य उत्सवामध्ये कार्यक्रमाला उपस्थित असलेले उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रिजेश पाठक यांना समाजवादी पक्षाचे प्रवक्ते दीपक रंजन यांनी भेट म्हणून निळा ड्रम दिल्याने राजकीय वर्तुळात आणि सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं आहे.
काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशमधील मेरठ येथे सौरभ राजपूत हत्याकांड घडले होते. या हत्याकांडातील आरोपी पत्नी मुस्कान हिने तिचा प्रियकर असलेल्या साहीलसोबत मिळून पतीची हत्या केली होती. त्यानंतर सौरभच्या मृतदेहाचे तुकडे करून ते निळ्या ड्रममध्ये टाकून त्यावर सिमेंटचे मिश्रण ओतले होते.
दरम्यान, अशाच प्रकारचा निळा ड्रम सामाजवादी नेत्यांनी भाजपाच्या ब्रिजेश पाठक यांना भेट म्हणून दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. तसेच त्यावरून वेगवेगळ्या चर्चाही होत आहेत. तसेच नेटकरी या निळ्या ड्रमच्या भेटीचे वेगवेगळे अर्थ लावत आहेत. मात्र लंतरानी हास्य उत्सवामध्ये आपण केवळ गंमत म्हणून मुख्यमंत्र्यांना हा ड्रम भेट दिल्याचे दीपक रंजन यांनी म्हटले आहे.