लखनौ -विधानसभेच्या निवडणुकीनंतर आता उत्तर प्रदेशमध्ये विधान परिषदेची निवडणूक रंगणार आहे. गोरखपूरमधील चर्चित डॉक्टर कफील खान यांना समाजवादी पक्षाने विधान परिषद निवडणुकीची उमेदवारी दिली आहे. कफील खान यांना गोरखपूरच्या बीआरडी रुग्णालयात झालेल्या मृत्यूंच्या प्रकरणात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी निलंबित केले होते. दरम्यान, कफील खान यांच्यावरील कारवाईने राजकीय रंग घेतला होता.
विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी आटोपल्यानंतर उत्तर प्रदेशच्या विधान परिषदेच्या निवडणुकीचे पडघम वाजले आहेत. उत्तर प्रदेशमधील ३६ विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी ९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. तर १२ एप्रिल रोजी निकाल जाहीर होणार आहेत. उत्तर प्रदेश विधान परिषदेच्या ३६ जागांसाठी ३० आणि ६ अशी दोन टप्प्यात निवडणूक जाहीर झाली आहे. मात्र ही निवडणूक एकाच दिवशी होणार आहे.
विधान परिषदेच्या ३६ जागांसाठी निवडणूक झाल्यानंतर पहिल्यांदाच भाजपाला विधान परिषदेत बहुमत मिळण्याची शक्यता आहे. सध्या सपाकडे सभागृहात बहुमत आहे. मात्र विधानसभा निवडणुकीपूर्वी काही आमदारांनी भाजपात प्रवेश केला होता. तर बसपाचाही एक आमदार भाजपात आला होता.