मेरठ : उत्तर प्रदेशात मेरठमध्ये नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात आंदोलन सुरू असताना मुस्लिमांच्या एका समूहाला ‘पाकिस्तानात जा’, असे सांगणाऱ्या एका पोलीस अधिकाºयाच्या व्हिडिओवरून वाद निर्माण झाला आहे. हा व्हिडिओ १ मिनिट ४३ सेकंदांचा आहे.सीएएवरून २० डिसेंबर रोजी मेरठ शहरात आंदोलन झाले. पोलीस अधीक्षक अखिलेश नारायण सिंह यांचा हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यात ते मुस्लिमांच्या एका समूहाला पाकिस्तानात जा, असे सांगत आहेत. अखिलेश सिंह हे एका समूहाला सांगत आहेत की, जे होत आहे ते योग्य नाही. यावर तिथे उपस्थित असलेला एक व्यक्ती म्हणतो की, जे लोक परिस्थिती बिघडवीत आहेत ते चुकीचे आहे. यावर अधिकारी म्हणतात की, त्यांना सांगा दुसºया देशात चालते व्हा. येथे चुकीचे काहीही सहन केले जाणार नाही.यावर प्रतिक्रिया देताना पोलीस अधीक्षकांनी सांगितले की, या व्हिडिओमध्ये जे काही ऐकायला मिळत आहे ते आंदोलकांना उत्तर होते. काही आंदोलक पाकिस्तानच्या समर्थनार्थ ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा देत होते. त्यामुळे प्रतिक्रिया म्हणून आपण हा सल्ला दिला की, ज्यांच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या जात आहेत तिकडे गेले तर चांगले होईल. समाजवादी पार्टीचे आ. रफिक अन्सारी म्हणाले की, एका संवैधानिक पदावर असलेल्या पोलीस अधिकाºयाने संयम ठेवायला हवा. त्यांनी अशा प्रकारे असंवैधानिक काही बोलू नये. ते ज्या लोकांबाबत बोलत होते तेही देशाचे नागरिकच आहेत. मेरठ विभागाचे एडीजी प्रशांत कुमार यांनीही एसपींचा बचाव करताना म्हटले आहे की, काही लोक भारतविरोधी आणि शेजारी देशाच्या समर्थनार्थ घोषणा देत होते. काही लोक पॉप्युलर फ्रंट आॅफ इंडिया आणि सोशल डेमोक्रॅटिक पार्टी आॅफ इंडियाचे आक्षेपार्ह पत्रके वाटत होते. ही माहिती मिळाल्यानंतर पोलीस अधीक्षक घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आंदोलकांना सांगितले की, आपण जिथे जाऊ इच्छिता तिथे जा; पण उपद्रव करू नका. एका आठवड्यानंतर आता शांतता असताना हा व्हिडिओ जारी करणे म्हणजे कटकारस्थानाचा भाग आहे. २० डिसेंबर रोजी मेरठमध्ये झालेल्या गोळीबारात पाच तरुणांचा मृत्यू झाला होता. (वृत्तसंस्था)बुलंदशहरच्या स्थानिकांनी दिले ६ लाख रुपयेआंदोलनादरम्यान सार्वजनिक संपत्तीचे नुकसान करणाºया लोकांकडून नुकसान भरपाई घेतली जाईल, असे उत्तर प्रदेश सरकारने यापूर्वीच जाहीर केलेले आहे. तथापि, बुलंदशहरच्या उपीरकोट भागातील स्थानिक रहिवाशांनी २० डिसेंबरला झालेल्या नुकसानीपोटी ६.२७ लाख रुपयांचा डिमांड ड्राफ्ट जिल्हाधिकारी रवींद्रकुमार आणि पोलीस अधीक्षक संतोष कुमार सिंह यांच्याकडे सुपूर्द केला आहे. पश्चात्तापानंतर लोकांनी स्वत:हून उचललेले हे पाऊल असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. भविष्यात अशा प्रकारचा हिंसाचार होणार नाही, असेही या नागरिकांनी म्हटले आहे.मुस्लिम व्यक्तीने पोलिसाचे वाचविले प्राणउत्तर प्रदेश आणि देशभरात अनेक ठिकाणी हिंसक आंदोलनाचे वृत्त सातत्याने येत असतानाच उत्तर प्रदेशातील एका घटनेने मानवतेला नवे परिमाण दिले आहे. अजय कुमार हे पोलीस एका मशिदीसमोर उभे असताना एका समूहातील एक जण म्हणाला की, यांना अगोदर ठार मारा. त्यानंतर या समूहाने या पोलिसावर हल्ला केला. यावेळी येथे असलेल्या कादीर (५२) यांनी कुमार यांना जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये नेऊन सोडले.
एसपी आंदोलकांना म्हणाले, ‘पाकिस्तानात जा’
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2019 1:35 AM