सोनाली देसाई, पणजीयेथे होणाऱ्या ४६व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘फोकस कंट्री’ म्हणून स्पेनची निवड झाली आहे. देश-विदेशातील नागरिकांना स्पेन देशाच्या संस्कृतीची ओळख व्हावी, या उद्देशाने ही निवड झालेली आहे.स्पॅनिश चित्रपट प्रेक्षकांच्या मनात वैशिष्ट्यपूर्ण ओळख निर्माण करण्यात सार्थ ठरला आहे. स्पॅनिश चित्रपटसृष्टीच्या इतिहासात ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक लुईस ब्युनुअल हे सार्वत्रिक ओळख साध्य करणारे प्रथम दिग्दर्शक होते. पेट्रो अल्मोण्डोव्हर यांनी स्पॅनिश चित्रपटाला खास ओळख मिळवून दिली. स्पॅनिश चित्रपटाने सेगुन्डो डी चोमोन, फ्लोरियन रे, लुईस ग्रासियस बरलांगा, जुआन अँटोनियो बार्डेम, कार्लोस साअुरा, जुलिओ मेडेम आणि अलेहांद्रो अमेनाबार यांच्या दिग्दर्शनाखाली आंतरराष्ट्रीय यश प्राप्त केले आहे. इंग्रजी भाषेतील चित्रपट स्पॅनिश निर्मात्यांनी प्रसारित केले आहेत. या चित्रपटांना चांगला प्रतिसाद लाभला आहे. ‘अगोरा’, ‘द मॅकेनिस्ट’, ‘घोस्ट’, ‘ द इम्पॉसिबल’ असे काही चित्रपट स्पॅनिश कंपन्यांनी निर्माण केलेले आहेत. इफ्फीद्वारे गतवर्षी चीनला फोकस कंट्रीचा मान मिळाला होता. चिनी चित्रपटांना रसिकांनी चांगला प्रतिसाद दिला होता.
इफ्फीत यंदा ‘फोकस कंट्रीत’ स्पेन झळकणार
By admin | Published: September 26, 2015 2:59 AM