ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १६ - संसदेच्या मागच्या अधिवेशनात ऐतिहासिक जीएसटी विधेयक मंजूर झाले. ते एक मोठे पाऊल होते. त्यासाठी मी सर्व पक्षांचे आभार मानले होते. या हिवाळी अधिवेशनातही विविध विषयांवर सकारात्मक चर्चा होईल अशी मला आशा आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले.
संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत आहे. त्यापूर्वी मोदींनी प्रसारमाध्यमांसमोर सरकारचा दृष्टीकोन मांडला. प्रत्येक पक्ष आपआपली मते मांडेल. आपण सर्व मिळून लोकांच्या इच्छा-आकांक्षांबद्दल चर्चा करु. प्रत्येक विषयावर मोकळेपणाने चर्चा व्हावी असे सरकारचे मत आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले.
हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या काही दिवसात नोटबंदीवरुन जोरदार गोंधळ होणार आहे. कारण ५०० आणि १ हजार रुपयाच्या नोटा चलनातून बाद केल्यानंतर निर्माण झालेल्या चलनतुटवडयामुळे नागरीकांचे हाल होत आहेत. याच मुद्यावर ममता बॅनर्जी यांनी विरोधकांची मोट बांधून सरकारची कोंडी करण्याची रणनिती केली आहे.