नवी दिल्ली - अमेरिकेच्या एका शिक्षण संस्थेच्या शोधानुसार संस्कृत भाषा बोलण्यामुळे शरीरातील मज्जासंस्था मजबूत होतात आणि मधुमेह, कोलेस्ट्रॉल हे आजार कमी होतात असा दावा भाजपा खासदार गणेश सिंह यांनी केला आहे. संस्कृत विश्वविद्यालय विधेयकाच्या चर्चेदरम्यान त्यांना हे वक्तव्य केलं आहे.
खासदार गणेश सिंह यांनी म्हटलंय की, अमेरिकेची अंतरिक्ष नासाने केलेल्या शोधानुसार जर संगणक प्रोग्राममध्ये संस्कृत भाषेचा वापर केल्यास संगणक अधिक सुलभ होईल. तसेच जगातील ९७ टक्क्यांपेक्षा जास्त भाषा संस्कृतवर आधारित आहेत. यामध्ये काही इस्लामिक भाषाही आहेत असं त्यांनी सांगितले.
तर संस्कृत भाषेवर बोलताना केंद्रीय मंत्री प्रतापचंद्र सारंगी यांनी भाषा खूप लवचिक आहे आणि एक वाक्य अनेक प्रकारे बोलले जाऊ शकते असं सांगितले. त्याचसोबत भाई आणि गाय यासारखे इंग्रजी शब्द संस्कृतमधून तयार झालेले आहेत. या प्राचीन भाषेच्या जाहिरातीचा इतर कोणत्याही भाषेवर परिणाम होणार नाही, असे सारंगी म्हणाले.
लोकसभेने गुरुवारी केंद्रीय संस्कृत विद्यापीठ विधेयक २०१९ ला देशातील तीन मानद संस्कृत विद्यापीठांना केंद्रीय विद्यापीठाचा दर्जा देण्यास मान्यता दिली. या विधेयकांतर्गत नवी दिल्ली स्थित राष्ट्रीय संस्कृत संस्थान आणि तिरुपती येथील श्री लाल बहादूर शास्त्री विद्यापीठ तसेच राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठ यांना केंद्रीय विद्यापीठाचा दर्जा देण्यात आला आहे.
यापूर्वीही भाजपाच्या अनेक नेत्यांनी अशी विधाने केली आहेत, पश्चिम बंगालचे भाजपा प्रमुख दिलीप घोष यांनी भारतीय गायींच्या दुधात सोनं असल्याची माहिती सर्वांना दिली. त्याचबरोबर त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब कुमार देबही या यादीमध्ये मागे नाहीत. महाभारत काळात इंटरनेट आणि सॅटेलाइटचा वापर होता असं मुख्यमंत्र्यांची शपथ घेतल्यानंतर देब यांनी केलं होतं. ते म्हणाले, 'देशात हे प्रथमच घडत नाही. आपला देश हा देश आहे ज्यामध्ये महाभारताच्या वेळी संजय हस्तिनापुरात बसून धृतराष्ट्राला कुरुक्षेत्राच्या युद्धात काय घडत आहे हे सांगितले. संजय डोळ्यापासून इतका दूर कसा राहू शकेल? याचा अर्थ असा की त्यावेळी देखील तंत्रज्ञान, इंटरनेट आणि उपग्रह होते असं विधान त्यांनी केलं होतं.