भोपाळ: कुंकू लावल्यानं रक्तदाब नियंत्रणात राहतो, तुळशीजवळ राहिल्यानं शितलता कायम राहते, असे दावे बुधवारी एनसीईआरटीकडून चालवण्यात येणाऱ्या एका संस्थेनं विज्ञान विषयावर एका परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी अनेक व्याख्यातांनी अजब दावे केले. त्यामुळे शास्त्रज्ञ नाराज झाले. कुंकू लावल्यानं रक्तदाब नियंत्रणात राहतो, असा दावा यावेळी एका वक्त्यानं केला. तर दुसऱ्यानं नमस्कार केल्यानं आजारापासून दूर राहता येतं, असं अजब विधान केलं. यावेळी उपस्थित असलेल्या अनेकांच्या चेहऱ्यावरील भाव पाहण्यासारखे होते. वक्तांच्या दाव्यांवर अनेकांचा विश्वास बसत नव्हता. परिषदेतील व्याख्यानं आणि त्यात काय करण्यात आलेले दावे याबद्दल शास्त्रज्ञांनी नाराजी व्यक्त केली. या परिषदेला कोणताही वैज्ञानिक आधार नसल्याचं शास्त्रज्ञ म्हणाले. विज्ञानाशी पूर्णपणे विसंगत असलेल्या विधानांवर विश्वास ठेऊ नये, असं आवाहन अनेक शास्त्रज्ञांनी केलं. या परिषदेचं आयोजन करणाऱ्या आयआयईला शास्त्रज्ञांकडून समज देण्यात आली आहे. 'आम्ही आयआयईचे प्राचार्य एन. प्रधान यांना ई-मेल केला आहे. अशा प्रकारच्या भ्रामक दावे करणाऱ्या संशोधन पत्रिका जमा करण्याची परवानगी दिली जाऊ नये. अशा प्रकारच्या घटना घडतात, विज्ञानाचा कोणताही आधार नसलेल्या गोष्टींवरील संशोधन पत्रिका नाकारण्याऐवजी त्या जमा करुन घेतल्या जातात. इतकंच नव्हे, तर त्यावर चर्चा घडवल्या जातात. हे अतिशय वाईट आहे,' असं कोलकात्यातील भारतीय विज्ञान आणि संशोधन संस्थेचे प्राध्यापक सौमित्रो बॅनर्जींनी सांगितलं.
कुंकू लावल्यानं बीपी होतं कंट्रोल; अजब दाव्यानं शास्त्रज्ञांचं बीपी वाढलं
By ऑनलाइन लोकमत | Published: February 07, 2019 2:14 PM