ऑनलाइन लोकमत
चेन्नई, दि. 22- धर्मावर बोलल्यामुळे केरळमध्ये एका प्राध्यापिकेला आणि लेखकाला धमक्या येत असल्याचा प्रकार समोर आला आहे. केरळमध्ये शु्क्रवारी अशी दोन प्रकरणं समोर आली. मल्याळम लेखकाने हिंदू-मुस्लिम एकतेवर लेख लिहिला होता. आता त्यांना इस्लाम धर्मात प्रवेश घ्या नाहीतर परिणामांना सामोरं जा, अशी धमकी देण्यात आली आहे. तर एका प्राध्यापिकेने प्रसिद्ध चित्रकार दिवंगत एम.एफ.हुसेन यांनी काढलेलं सरस्वतीचं चित्र योग्य असल्याचं म्हटल्यामुळे त्यांच्यावर अॅसिड फेकण्याची धमकी सोशल मीडियावर देण्यात आली आहे. या दोन्ही प्रकरणांची पोलिसांनी तक्रार दाखल केली असून तपास सुरू झाला आहे.
आणखी वाचा
केरळमधील वर्मा महाविद्यालयाच्या प्रोफेसर दीपा निसांथ यांना हिंदुत्ववादी संघटनांनी धमकी दिली आहे. त्यांनी एसएफआय या विद्यार्थी संघटनेने लावलेल्या पोस्टरचं समर्थन केलं होतं. यामध्ये एम.एफ.हुसेन यांनी आपल्या चित्रात सरस्वती काढली होती. त्याला दीपा यांनी पाठिंबा दिला होता. कॉलेजमध्ये येणाऱ्या फ्रेशर्सच्या स्वागतासाठी एसएफआयने हे पोस्टर लावलं होतं. या पेंटिगला हिंदूत्ववादी संघटना विरोध करत होत्या. पण दिपा निसांथ यांनी मात्र या पोस्टरला पाठिंबा दिला होता. सरस्वती देवीला आक्षेपार्ह स्थिती दाखवून हुसेन यांनी हिंदू धर्माचा अपमान केला आहे, असा दावा या संघटनांनी केला होता. दीपा यांनी या पोस्टरला पाठिंबा दिल्याने त्यांना अॅसिड अटॅकची धमकी सोशल मीडियावरून देण्यात आली होती. तसंच फोटोशॉप केलेला त्यांचा एक आक्षेपार्ह अवस्थेतील एक फोटो या संघटनांनी सोशल मीडियावर टाकला आहे, असं दीपा यांनी तक्रारीत म्हंटलं आहे.
तर दुसरीकडे हिंदू मुस्लिम एकतेवर लिहिणारे लेखक के.पी.रमनउन्नी यांनाही धमकीचं पत्र मिळालं आहे. सहा दिवसांआधी त्यांना धमकीचं पत्र आलं होतं. यात हिंदू-मुस्लिम एकतेवर लिहिल्यामुळे त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. रमनउन्नी यांना आलेल्या पत्राची सध्या तपासणी सुरू आहे. रमनउन्नी कोझिकोड इथे राहतात. रमजानच्या काळात त्यांनी काही लेख लिहिले होते. हिंदू मुसलमानांचे शत्रू नाहीत, असं त्यांनी आपल्या लेखात म्हटलं होतं. रमजानच्या काळात आपल्या लेखाचं कौतुक झालं होतं. पण अचानक असं काय झालं की मला धमकी येऊ लागली, असा प्रश्न रमनउन्नी यांना पडला आहे. रमनउन्नी यांना प्रोफेसर टी.जी.जोसेफ यांच्यासारख्या परिणामांना सामोरे जाण्याची धमकी देण्यात आली आहे. २०१० मध्ये जोसेफ यांनी प्रेषित मोहम्मद यांचा अपमान केल्याचा आरोप करत त्यांचा हात कापण्यात आला होता. 2009-2010 मध्ये बीकॉमच्या इंटर्नल परीक्षेत त्यांनी प्रेषित मोहम्मत यांच्याबद्दल प्रश्न विचारचाना टीका केली होती. त्यांच्या या टीकेमुळे नाराज असलेल्या एका संघटनेने जोसेफ यांच्यावर हल्ला केला होता.