PM Modi in Gujarat: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी गांधीनगरमध्ये चौथ्या जागतिक अक्षय ऊर्जा गुंतवणूकदार परिषदेला संबोधित केले. चौथ्या ग्लोबल री-इन्व्हेस्ट रिन्यूएबल एनर्जी इन्व्हेस्टर्स मीटचे उद्घाटन करताना मला विश्वास आहे की येत्या तीन दिवसांत ऊर्जा, तंत्रज्ञान आणि राजकारणाच्या भविष्यावर गंभीर चर्चा होईल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. गेल्या १०० दिवसात सरकारने १२ स्मार्ट सिटी तयार करण्याची घोषणा केल्याचेही पंतप्रधान मोदींनी म्हटलं. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्याबाबतचा एक किस्सा सांगितला.
"भारतातील जनतेने ६० वर्षांनंतर सलग तिसऱ्यांदा सरकारला सत्तेत येण्याची संधी दिली. सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळामागे भारताच्या मोठ्या आकांक्षा आहेत. आज १४० कोटी भारतीयांना खात्री आहे की, गेल्या १० वर्षात त्यांच्या आकांक्षांना जे पंख फुटले आहेत, त्याद्वारे तिसऱ्या कार्यकाळात नवीन उड्डाण घेता येणार आहे. देशातील दलित, पीडित, वंचित आणि शोषित जनतेसाठी आमची तिसरी टर्म त्यांना सन्मानाने जगण्याची हमी देणारी ठरेल, यावर मला विश्वास आहे. २०४७ पर्यंत भारताला विकसित देश बनवण्याच्या आमच्या योजनेचा हा एक भाग आहे. गेल्या दोन टर्ममध्ये आम्ही अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. आम्ही भारतात ७ कोटी घरे बांधत आहोत. जगातील अनेक देशांच्या लोकसंख्येपेक्षा हे प्रमाण जास्त आहे. सरकारच्या शेवटच्या कार्यकाळात आम्ही ४ कोटी घरे बांधली आणि तिसऱ्या कार्यकाळात ३ कोटी नवीन घरे बांधण्याचे कामही आमच्या सरकारने सुरू केले आहे," असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
"गेल्या १०० दिवसांत आम्ही भारतात १२ नवीन आठ हायस्पीड कॉरिडॉर प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. आम्ही १५ हून अधिक नवीन मेड इन इंडिया सेमी-हायस्पीड वंदे भारत ट्रेन लॉन्च केल्या आहेत. संशोधनाला चालना देण्यासाठी आम्ही एक ट्रिलियनचा संशोधन निधी तयार केला आहे. इलेक्ट्रिक मोबिलिटीला प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही अनेक नवीन उपक्रम सुरू केले आहेत. जैव उत्पादनाला प्रोत्साहन देणे हे आमचे उद्दिष्ट आहे. या महिन्याच्या सुरुवातीला ग्लोबल फिनटेक फेस्टचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर जगभरातील लोकांनी पहिल्या सोलर इंटरनॅशनल फेस्टिव्हलमध्ये भाग घेतला. मग जगाच्या कानाकोपऱ्यातून लोक ग्लोबल सेमीकंडक्टर समिटमध्ये आले आणि आता आज आपण हरित ऊर्जेच्या भविष्यावर चर्चा करण्यासाठी येथे जमलो आहोत. आमच्यासाठी, ग्रीन फ्युचर, नेट झिरो हे फॅन्सी शब्द नाहीत. ही भारताची गरज आहे, ही भारताची बांधिलकी आहे, ही भारताच्या प्रत्येक राज्य सरकारची बांधिलकी आहे," असंही पंतप्रधान मोदी म्हणाले.
"एकदा ओबामा द्विपक्षीय बैठकीसाठी येथे आले होते. आम्ही दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी एका पत्रकाराने मला विचारले होते की, जगातील वेगवेगळे देश वेगवेगळे आकडे जाहीर करतात. अशी आकडेवारी जाहीर करण्यासाठी तुमच्यावर दबाव आहे का? किंवा काही प्रकारचे लक्ष्य सेट करण्यासाठी दबाव आहे? यावर मी म्हणालो होतो की, हा मोदी आहे त्याच्यावर कोणतेही दडपण चालत नाही. तेव्हा मी म्हटलं की हो, माझ्यावर दबाव आहे आणि हा दबाव माझ्यावर आपल्या भावी पिढीच्या मुलांकडून आहे, ज्यांचा जन्मही झालेला नाही, ज्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मी दबावाखाली आहे आणि मी त्यांच्यासाठी काम करत राहीन," असं पंतप्रधान मोदींनी म्हटलं.