संसदेत महिला आरक्षणावर बोलताना सुप्रिया सुळेंकडून महाराष्ट्रातील २ 'दादा' लक्ष्य
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2023 05:58 PM2023-09-20T17:58:52+5:302023-09-20T18:05:02+5:30
आरक्षणाचा विषयच निघाला आहे, तर महाराष्ट्रात मराठा, धनगर, लिंगायत आणि मुस्लीम आरक्षणाचा मुद्दाही सध्या लक्षवेधी आहे
नवी दिल्ली - महिला आरक्षण विधेयकावरून देशातील राजकारण चांगलंच तापलं आहे. केंद्र सरकारने लोकसभेत मंगळवारी हे विधेयक मांडलं. आज या विधेयकावर लोकसभेत चर्चा सुरू असून विविध पक्षातील नेते मंडळी आपापली मतं मांडत आहेत. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी याला समर्थन देत म्हटले, "महिला आरक्षण विधेयक हे माझे पती राजीव गांधी यांचं स्वप्न होतं. त्यामुळे ते सरकारनं लवकरात लवकर पूर्ण करावं." राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही या विधेयकावरील चर्चेत भाग घेतला. यावेळी, त्यांनी मराठी सुरू असलेल्या आरक्षणाच्या इतही मुद्द्यावर भाष्य केलं. तर, अप्रत्यक्षपणे महाराष्ट्रातील दोन दादांवर निशाणा साधला.
आरक्षणाचा विषयच निघाला आहे, तर महाराष्ट्रात मराठा, धनगर, लिंगायत आणि मुस्लीम आरक्षणाचा मुद्दाही सध्या लक्षवेधी आहे. त्यावरही सभागृहात चर्चा झाल्यास आम्हाला चर्चेत सहभाग घ्यायला आनंदच होईल, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले. तसेच, महिला आरक्षणावरुन भाजप नेते महिला सक्षमीकरणावर बोलत आहेत. मात्र, महाराष्ट्रातील भाजपच्या प्रमुखांनीच मला व्यक्तिगत लक्ष्य करत घरी जाऊन जेवण बनवा असे म्हटल्याची आठवणी सुप्रिया सुळेंनी संसदेत सांगितली.
महाराष्ट्रात भाजपचे प्रमुख नेते असलेल्यांनी थेट माझ्यावर टीका करताना मला घरी जाऊन चुल सांभाळण्याचा सल्ला दिला होता. सुप्रिया सुळेंनी घरी जावं, जेवण बनवावं, देश कुणी दुसरे चालवतील, आम्ही चालवू, असे म्हटले होते. हे टेलिव्हीजनवर ऑन रेकॉर्ड आहे, असेही त्यांनी म्हटले. दरम्यान, सुप्रिया सुळेंनी चंद्रकांत पाटील यांच्या विधानाची आठवण ससंदेत सांगितली.
संसदेत एका खासदाराला उद्देशून बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, व्हाय कान्ट वुमेन, भाई भी कर सकता है. मात्र, प्रत्येक घरात असा भाऊ नसतो, जो बहिणीचं सगळं चांगलं कल्याण होऊ इच्छितो. प्रत्येकाचं नशिब एवढं चांगलं नसतं, असे म्हणत सुप्रिया सुळेंनी नाव न घेत अजित पवारांना लक्ष्य केल्याचं दिसून आलं. सुप्रिया सुळे विशेष अधिवेशनात गेल्या २ दिवसांपासून भाजप आणि सरकारला लक्ष्य करत आहेत. त्यासोबतच, अप्रत्यक्षपणे अजित पवार यांच्यावरही निशाणा साधत आहेत.
हे विधेयक म्हणजे सरकारचा जुमला - सुळे
महिला आरक्षण विधेयक म्हणजे सरकारचा जुमला असल्याची टीका देखील सुप्रिया सुळेंनी केली. त्या म्हणाल्या की, जेव्ही मी संसदेत निवडून आले होते तेव्हा फक्त वृंदा करात आणि सुषमा स्वराज या दोन महिला इथे होत्या. सरकारला या विधेयकाचा फायदा होईल की नाही माहिती नाही पण हा या सरकारचा जुमला आहे. त्यामुळे मला वाटते की खूप विचार करण्याची गरज नाही. कारण मोदी सरकारने निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हे बिल आणलं आहे.
"माझ्यासारख्या महिलांनी आरक्षण घेऊ नये"
तसेच मी एक लोकप्रतिनिधी असून माझ्यासारख्या महिलांनी आरक्षण घेऊ नये असे मला वाटते. हे आरक्षण त्या महिलांसाठी आहे, ज्यांना संधी मिळत नाही. त्यामुळे याचा लाभ मी कसा काय घेणार? माझ्यासारख्या महिलांनी हेच काय तर मराठा, ओबीसींचं असेल, धनगर, मुस्लिम असेल कोणतंच आरक्षण घेऊ नये. ज्याला खरोखर आरक्षणाची गरज आहे त्याला यामुळे फायदा होईल. आम्हाला शिक्षण मिळालंय, घरच्यांनी आम्हाला आमच्या पायावर उभं केलं आहे. त्यामुळे मला वाटते की आम्ही या आरक्षणाचा लाभ घ्यायला नको, असेही सुप्रिया सुळेंनी स्पष्ट केले. त्या एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलत होत्या.