गौरीशंकर घाळे
लखनऊ : विकास, रोजगार शेतकरी वगैरे मुद्दे, जाहिरनाम्यातील आश्वासने तिसऱ्या टप्प्यातील मतदानाचा दिवस उजाडेपर्यंत अक्षरशः हवेत विरून गेली आहेत. प्रचाराने आता खास 'युपी टाईप' वळण घेतले आहे. आता चलती आहे ती तंमचा, कट्टापासून गोलाची (बर्फाचा नव्हे तर तोफगोळ्यांचा). भाजपच्या दिल्लीपासून युपीतल्या नेत्यांच्या मुखी सध्या हेच परवलीचे शब्द आहेत. तर, समाजवादी पार्टीचे एकांडे शिलेदार अखिलेश यादव हे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांनाच माफीया ठरवून मोकळे झाले आहेत.
पहिल्या दोन टप्प्यातील लढाई तिसऱ्या टप्प्यावर घमासान बनली. आपल्या प्रभावक्षेत्रात अधिकाधिक यश खेचण्यासाठी अखिलेश यादवांनी पूर्ण जोर लावला. तर, भाजपची अजस्त्र यंत्रणा हे समाजवादी आक्रमण थोपविण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करताना दिसली. चौथ्या टप्प्यावर मात्र भाजपने आक्रमक डाव टाकायला सुरूवात केली आहे. याचे उद्घाटन संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी केले. समाजवादीच्या काळात देशी कट्टे चालायचे, योगी-मोदींच्या काळात आम्ही कट्टे नाही तर गोळे बनवत आहोत. थेट लष्कराचे गोळे बनवायच्या फॅक्टऱ्या उभारल्याचे राजनाथ सिंग म्हणाले. राजनाथ यांचा हा नेम अचूक बसला. समाजवादी सत्ताकाळातील 'तंमच्चा-राज'ची जपमाळ ओढत मतदारांना जुन्या दिवसांची आठवण त्यांनी करून दिली.
भाजपचा हा बदललेला पवित्रा ओळखून अखिलेश यांनी ताबडतोड उत्तर देत उलटा डाव टाकला. योगी आणि त्यांचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य हेच प्रदेशातील सर्वात मोठे माफिया असल्याचे ते म्हणाले. भाजपचे हल्ले अखिलेश परतवून लावत आहेत. सपाच्या प्रचाराचा केंद्रबिंदूही तेच आहेत. यादव मतांवर सध्या अखिलेशांची सायकल सुसाट आहे. पण, तीन टप्प्यात स्वतःच्या ट्रॅकवर चालणारी ही सायकल आता आपल्या ट्रॅकवर चालवण्याचा भाजपचा डाव काहीसा यशस्वी होत आहे.