नाशिक : मार्चच्या दुसर्या आठवड्यात उन्हाळ्याची तीव्रता वाढीस लागून यंदा गेल्या वर्षापेक्षा पाणी टंचाईची भीषण परिस्थिती निर्माण होणार असल्याने टंचाईग्रस्त गावांना टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने मागविलेल्या निविदांना तीन खासगी टॅँकरचालकांनी प्रतिसाद दिला असला तरी, तिघांनी पाणी वाहतुकीचे समान दर भरल्याने त्यांच्याशी वाटाघाटी करण्याची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे. मात्र टॅँकर चालकांकडून होणारी पाणी चोरी रोखण्यासाठी यंदा विविध उपाययोजना करण्याचे ठरविण्यात आले आहे. टंचाईग्रस्त गावांमध्ये पाणीपुरवठा करणार्या टॅँकर चालकांकडून फेर्या अधिक दाखविणे, पाणी भरण्याचे ठिकाण ते पाणी पोहोचविण्याच्या ठिकाणाचे अंतर वाढून दाखविणे, टॅँकर न पोहोचविताच, प्रत्यक्षात देयक सादर करणे, मोठ्या टॅँकरऐवजी छोटे पाठवून पाणी चोरी करणे अशा अनेक कारणांने टॅँकर घोटाळा दरवर्षी गाजतो. प्रशासनाकडून पाणीपुरवठ्यात पारदर्शीपणा येण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जातात, परंतु त्यातूनही पळवाटा शोधण्यात येतात. यंदा धरणांमध्ये जेमतेम साठा, तर नद्या कोरड्याठाक पडून विहिरींनी तळ गाठला आहेत, अशा परिस्थितीत गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ग्रामीण व प्रसंगी शहरीभागात भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार असून, प्रशासनाच्या मते मेअखेरपर्यंत पाणीपुरवठा करणार्या टॅँकरची संख्या अडीचशेच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. त्यासाठी खासगी टॅँकरचालकांकडून निविदा मागविण्यात आल्या असता, सध्या पाणीपुरवठा करणार्या टॅँकरचालकांनीच त्यात सहभाग घेतला, परंतु तीनही निविदाधारकांनी समान दर भरल्यामुळे नेमकी कोणती निविदा ग्रा धरायची याबाबत प्रशासन विचार करीत आहे. टॅँकरच्या पाणी चोरी रोखण्यासाठी प्रशासनाने ज्या काही उपाययोजना केल्या आहेत, त्यात प्रामुख्याने ५० लाख रुपयांची अनामत निविदाधारकांकडून जमा केली जाणार असून, जेणे करून भविष्यात निविदेतील अटी-शर्तींचा भंग झाल्यास अनामतीच्या रक्कमेतून त्याची भरपाई करणे सोपे होणार आहे. त्याचबरोबर प्रत्येक टॅँकरला जीपीएस सिस्टीम सक्तीची करण्यात आली असून, ज्या ठिकाणाहून टॅँकर पाणी भरेल त्या ठिकाणी तशी नोंद घेण्याबरोबरच पाणी पोहोचविल्या जाणार्या गावातील एका महिलेची टॅँकरच्या फेरीवर स्वाक्षरी घेण्याची मुख्य अट टाकण्यात आली आहे. या शिवाय ज्या गावांना टॅँकर मंजूर केले, त्या गावात नियमित टॅँकर पोहोचते की नाही यासाठी अचानक भेटी देऊन तपासणी करण्याचेही ठरविण्यात आले आहे.
टॅँकरच्या पाणी चोरीवर विशेष लक्ष दुष्काळाच्या झळा : ठेकेदाराच्या तीन निविदा प्राप्त
By admin | Published: March 11, 2016 10:26 PM