नवी दिल्ली - कथित आयएनएक्स मीडिया घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आलेले माजी केंद्रीय वित्तमंत्री पी. चिदंबरम यांना कोर्टाने आज मोठा धक्का दिला. चिदंबरम यांना आज न्यायालयात हजर केले असता सीबीआय कोर्टाने त्यांच्या कोठडीत वाढ करत त्यांना 2 सप्टेंबरपर्यंत सीबीआय कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
सीबीआयने पी. चिदंबरमय यांच्या कोठडीत पाच दिवसांनी वाढ करण्याची मागणी राउज एव्हेन्यू कोर्टाकडे केली होती. माजी केंद्रीय मंत्री असलेले चिदंबरम हे तपासामध्ये सहकार्य करत नसल्याचा तसेच विचारलेल्या प्रश्नांची स्वैर उत्तरे देत असल्याचे सीबीआयने कोर्टात सांगितले. तसेच चिदंबरम आणि इतर आरोपींची एकदा समोरासमोर चौकशी करण्याची गरज असल्याचेही सीबीआयने कोर्टात सांगितले.
दरम्यान, ॉआयएनएक्स मीडियाप्रकरणी माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना काल सुप्रीम कोर्टाने दिलासा दिला होता. चिदंबरम यांना येत्या ५ सप्टेंबरपर्यंत अटक न करण्याचे आदेश कोर्टाने अंमलबजावणी संचालनालयाला (ईडी) दिले होते. या प्रकरणी येत्या ५ सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे. आएनएक्स मीडिया आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी पी. चिदंबरम यांची चौकशी करण्यासाठी त्यांना अटक करण्याची मुभा देण्यासाठी ईडीने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. मात्र, कोर्टाने चिदंबरम यांना ५ सप्टेंबरपर्यंत दिलासा देत त्यांच्या अटकेला ईडीला मनाई केली आहे.