Delhi Drugs Case : केंद्रीय तपास यंत्रणेच्या माहितीच्या आधारे, दिल्लीपोलिसांच्या स्पेशल सेलने चार कुख्यात ड्रग तस्करांना अटक करून एका मोठ्या आंतरराष्ट्रीय सिंडिकेचा पर्दाफाश केला. त्यांच्या ताब्यातून तब्बल ५६२ किलो कोकेन आणि ४० किलो थाई गांजा जप्त करण्यात आला आहे. हे गांजा हायड्रोपोनिक पद्धतीने तयार केला जात होता. मात्र आता दिल्लीतून जप्त करण्यात आलेल्या २००० कोटी रुपयांच्या कोकेनप्रकरणी मोठा खुलासा झाला आहे. या ड्रग्ज प्रकरणातील मुख्य आरोपीचा काँग्रेस पक्षाशी संबंध असल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे.
दिल्लीत बुधवारी पोलिसांच्या गुन्हे शाखेने बुधवारी आंतरराष्ट्रीय ड्रग्ज सिंडिकेट उघडकीस आणलं. दक्षिण दिल्लीतील मेहरौली येथून पोलिसांनी ५६० किलो कोकेन जप्त केले. आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत सुमारे २००० कोटी रुपये इतकी आहे. याप्रकरणी पोलिसांनी चार तस्करांना अटक केली . यातील हाशिमी मोहम्मद वारिस आणि अब्दुल नायब या दोन आरोपींकडून ४०० ग्रॅम हेरॉईन आणि १६० ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आले आहे. दोन महिन्यांपूर्वी पोलिसांना ड्रग्ज पुरवठ्याबाबत माहिती मिळाली होती. हे तस्कर दिल्ली आणि एनसीआरमध्ये अंमली पदार्थाची तस्करी करण्याचा प्रयत्न करत होते.
दिल्लीत इतक्या मोठ्या प्रमाणात कोकेन जप्त करण्याची ही पहिलीच वेळ आहे. यातील एका आरोपीचे नाव तुषार गोयल असे आहे. तो दिल्लीतील वसंत विहार येथील रहिवासी आहे. त्याच्यासोबत त्याचे दोन मित्र हिमांशू आणि औरंगजेबही होते. तुषार, हिमांशू आणि औरंगजेब यांच्याकडून सुमारे १५ किलो कोकेन जप्त करण्यात आले. या ड्रग सिंडिकेटचा मास्टरमाईंड आणि मुख्य आरोपी तुषार गोयल असल्याचे समोर आलं आहे.
आज तकच्या वृत्तानुसार, तुषार गोयल २०२२ मध्ये दिल्ली प्रदेश काँग्रेसच्या आरटीआय सेलचा अध्यक्ष होता. त्याच्या सोशल मीडिया प्रोफाइलवर दिल्ली प्रदेश काँग्रेसचे आरटीआय सेलचे अध्यक्ष असे लिहिले आहे. आरोपीने सोशल मीडियावर डिकी गोयल नावाने प्रोफाइल तयार केले आहे. तुषार गोयलचे अनेक काँग्रेस नेत्यांसोबतचे फोटोही समोर आले आहेत. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलच्या चौकशीत हा खुलासा झाला आहे.
दिल्लीत मोठ्या प्रमाणात सापडलेल्या कोकेनचा दुबईशी संबंध जोडला जात आहे. या प्रकरणात कोकेनचा मोठा पुरवठा करणाऱ्या दुबईतील एका बड्या व्यावसायिकाचे नावही समोर आले आहे. स्पेशल सेलचे अतिरिक्त आयुक्त प्रमोद कुशवाह यांनी सांगितले की,५६० किलो कोकेनसह ४० किलो गांजाही जप्त केला आहे. ज्याची किंमत २० कोटी रुपये आहे. या गांजा फुकेतहून विमानाने दिल्लीत आणण्यात आला होता. प्रमोद कुशवाहा यांच्या म्हणण्यानुसार, तीन महिन्यांपूर्वी केंद्रीय तपास यंत्रणेला याची माहिती मिळाली होती.