नेपाळ, दुबईतून संशयित ताब्यात; उर्वरितांना शोधण्याचे प्रयत्नरत्नागिरी : कोकण रेल्वे तसेच देशातील काही अन्य रेल्वे मार्गांवर अपघात घडवून आणण्याचे प्रयत्न काही प्रवृत्तींकडून झाले आहेत. या प्रकरणी केंद्रीय गुप्तचर यंत्रणेने नेपाळ व दुबईतून काही संशयितांना ताब्यात घेतले आहे. तसेच अशा प्रकारांबाबत विशेष समितीही नियुक्त करण्यात आली आहे. या समितीने चौकशीचे काम सुरू केले आहे, अशी माहिती रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी मंगळवारी येथे पत्रकारांशी बोलताना दिली. प्रभू म्हणाले, कोकण रेल्वे मार्गावर मुंबईतील दिवा स्थानकापासून काही अंतरावर गेल्या काही दिवसांत रेल्वे रुळांजवळ स्फोटक जिलेटीनच्या कांड्या आढळून आल्या होत्या. तसेच रेल्वे रूळांवर अपघात व्हावा, अशा हेतूनेच रेल्वेचे जुने रूळही मार्गावर आडवे टाकून ठेवण्यात आल्याचे प्रकार घडले आहेत. असेच प्रकार अन्य ठिकाणीही रेल्वेबाबत घडले आहेत. त्यामुळे कोकण रेल्वेबरोबरच अन्य रेल्वे यंत्रणाही सतर्क झाली आहे. तसेच केंद्रीय गुप्तचर यंत्रणेने यात गंभीरपणे लक्ष घातले आहे. या प्रकारांमागे नेमके कोण आहे, त्याचा छडा लावला जाणार आहे.गेल्या दोन वर्षांच्या काळात कोकण रेल्वेची विकासात्मक घोडदौड अत्यंत वेगाने सुरू असून यातर्फे अनेक सुविधा देण्यात आल्या आहेत. तसेच कोकण रेल्वेच्या प्रकल्पांसाठी २०१७-१८ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात ६०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यातील ही तरतूद समभागांच्या रूपात आहे. चिपळूण-कर्हाड मार्गासाठी ३०० कोटी, मार्ग विद्युतीकरणासाठी २०० कोटी, तर रोहा ते वीरपर्यंतच्या मार्ग दुपदरीकरणासाठी १०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. पुढील अर्थसंकल्पात आणखी निधीची तरतूद कोकण रेल्वेसाठी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. (प्रतिनिधी)संभाव्य ६४ अपघात टाळण्यात यशगेल्या काही महिन्यांत ६४ ठिकाणी संभाव्य अपघात टाळण्यात यश आले. कोकण रेल्वे मार्गावरही दिवा स्थानकापासून काही अंतरावर घातपाताचे प्रयत्न केले गेले. परंतु रेल्वे कर्मचारी व प्रवासी, नागरिक यांच्या जागरुकतेमुळे हे अपघात टाळण्यात यश आले. रेल्वे प्रवास हा अत्यंत सुरक्षित व्हावा, यासाठी रेल्वेने महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. रेल्वेच्या सुरक्षेसाठी एक लाख कोटी रुपयांचा निधी वापरला जाणार आहे. नागरिकांनीही रेल्वेला सहकार्य केल्यास अपघात टाळणे शक्य होईल, असे प्रभू यावेळी म्हणाले.
रेल्वे अपघातांच्या चौकशीसाठी विशेष समिती:सुरेश प्रभू
By admin | Published: February 15, 2017 7:09 PM