नवी दिल्ली : मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसकडून पाठिंबा मिळण्याची कोणतीही शक्यता दिसत नसल्यामुळे सरकारने जीएसटी विधेयक पारित करण्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलाविण्याची आपली योजना रद्द केली असून, लोकसभा आणि राज्यसभा संस्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.‘जीएसटीवरील काँग्रेसची कठोर भूमिका आणि राजकीय वस्तुस्थिती लक्षात घेता राष्ट्रपतींना संसदेचे पावसाळी अधिवेशन संस्थगित करण्याची शिफारस करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या राजकीय कामकाज समितीने घेतला आहे,’ असे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सांगितले. काँग्रेस आपल्याला ४४ वर (लोकसभेतील खासदार) आणणाऱ्या लोकांवर सूड उगवत असल्याचे दिसते, अशा शब्दांत जेटली यांनी काँग्रेसवर टीका केली. वस्तू आणि सेवा करावरील घटना दुरुस्ती विधेयकाला संसदेची मंजुरी मिळविण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावण्याची सरकारची इच्छा होती; परंतु काँग्रेससोबतच्या चर्चेतून कसलाही निष्कर्ष न निघाल्यामुळे सरकारने विशेष अधिवेशन बोलाविण्याचा विचार तात्पुरता सोडून दिलेला आहे. तथापि, जीएसटी विधेयकावर मतैक्य घडवून आणण्याचे प्रयत्न मात्र सुरूच राहतील, असे जेटली यांनी स्पष्ट केले. (लोकमत न्यूज नेटवर्क)
विशेष अधिवेशनाची योजना बारगळली
By admin | Published: September 10, 2015 3:09 AM