लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: कोट्यवधी रुपयांचा घोटाळा करून फरार झालेले विजय मल्ल्या, नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांना अटक करण्यात अपयशी ठरलेल्या ईडीवर विशेष पीएमएलए न्यायालयाने जोरदार टीका केली. हे सर्व लोक देशाबाहेर पळू शकले, कारण संबंधित तपास यंत्रणा त्यांना योग्यवेळी अटक करण्यात अपयशी ठरली, अशा शब्दांत न्यायालयाने ईडीला सुनावले.
चार्टर्ड अकाऊंटंट व्योमेश शहा याला परदेशात जाण्यापूर्वी न्यायालयाची परवानगी घेण्यासंबंधी घातलेली अट विशेष पीएमएलए न्यायालयाचे न्या. एम. जी. देशपांडे यांनी रद्द केली. शहा याच्यावर गरवारे इंडस्ट्रीजच्या निहार गरवारे यांच्यासाठी पैशांची अफरातफर केल्याचा आरोप आहे. त्याला गेल्यावर्षी अटक करण्यात आली होती. बीकेसीच्या एका प्रॉपटी व्यवहारादरे जे. अँड के. बँकेला १०० कोटी रुपयांचे नुकसान पोहोचविल्याचा आरोप आहे. शहा याची सशर्त जामिनावर सुटका केली. न्यायालयाच्या परवानगीशिवाय देश सोडून जाऊ शकत नाही, अशीही एक अट शहा याला घालण्यात आली होती. ही अट रद्द करण्यात यावी, यासाठी शहा याने विशेष न्यायालयात अर्ज केला. या अर्जाला ईडीच्या वकिलांनी विरोध केला.