भोपाळ (मध्यप्रदेश) : पत्नीला मारहाण केल्याच्या आरोपावरून विशेष महासंचालक पुरुषोत्तम शर्मा यांना कार्यमुक्त करून गृहमंत्रालयाशी जोडण्यात आले आहे. पत्नीला मारहाण करीत असलेला शर्मा यांचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर पसरला आहे. या व्हिडिओनुसार शर्मा हे पत्नीला जमिनीवर पाडून भयंकर मारहाण करताना दिसतात. शर्मा यांच्या मुलाने या घटनेची माहिती राज्याचे गृहमंत्री, मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकांना देऊन वडिलांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. मात्र, अद्याप पुरुषोत्तम शर्मा यांच्याविरोधात गुन्हा दाखल झालेला नाही.
मिळालेल्या माहितीनुसार शर्मा यांच्या पत्नीने पतीला एका महिलेसोबत पकडले होते. याचा राग येऊन शर्मा यांनी घरी आल्यावर तिला मारहाण सुरू केली. व्हिडिओत शर्मा पत्नीला जमिनीवर आदळून बुक्क्या मारताना व काही लोक तिला वाचवण्याचाही प्रयत्न करताना दिसतात. मारहाणीची ही घटना घरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात टिपली गेली. मारहाण रविवारी दुपारी २.४९ वाजता झाली. जवळपास साडेचार मिनिटांच्या या व्हिडिओत शर्मा निर्दयपणे मारहाण करताना पत्नीला शिवीगाळही करीत होते.व्हिडिओ पसरल्यानंतर पुरुषोत्तम शर्मा यांनी मी कोणताही गुन्हा केलेला नसून मी व माझी पत्नी यांच्यातील हा कौटुंबिक प्रश्न आहे, असा दावा केला.2008 मध्येही तिने माझ्याविरोधात तक्रार केली होती. मग १२ वर्षांपासून ती माझ्या घरात का राहते, माझे पैसे का वापरते, माझ्या पैशांनी विदेशात का जाते?, असे प्रश्न त्यांनी विचारले.च्मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी शर्मा यांना कार्यमुक्त करण्यात आले असून, जबाबदारीच्या पदावरील कोणत्याही व्यक्तीने बेकायदा वर्तन केले, कायदा हाती घेतला तर त्याच्यावर कारवाई होईल, असे स्पष्ट केले.