नवी दिल्ली - देशभरात अनेकदा विविध कंपन्यांच्या नेटवर्कला रेंज येत नसल्याची ओरड आपण ऐकतो, पाहतो. अनेकदा आपल्यालाही तसा अनुभव येतो. त्यातली त्यात बीएसएनएल आणि एमटीएनएल या सरकारी कंपन्यांची अनेकदा अडचण असते. मावळ मतदारसंघातील शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनीच संसदेत मोबाईल फोनला रेंज येत नसल्यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला. विशेष म्हणजे संसद सभागृहात फक्त जिओ कंपनीच्या नेटवर्कलाच रेंज आहे. मात्र, सरकारी कंपनी असलेल्या बीएसएनल आणि एमटीएनएल कंपनीच्या तसेच इतरही कंपन्यांच्या कंपन्यांच्या सीमला नेटवर्क मिळत नसल्याचा प्रश्न उपस्थित केला.
संसद सत्र सुरु असताना संसदेचं काम व्यवस्थित चालण्यासाठी सर्वच कंपन्यांच्या मोबाईल कंपन्यांचे नेटवर्क बंद करण्यात आले आहे. त्यासाठी, संसद सभागृहाच्या आवारात जामर बसिवण्यात आले आहेत. मात्र, जामर बसविण्यात आल्यानंतरही संसदेत केवळ एकाच कंपनीचे नेटवर्क चालते. एमटीएनएल आणि बीएसएनएल या सरकारी कंपन्यांचे नेटवर्क देशभरातही नीट-नीटके चालत नाही. मात्र, संसद सभागृहात जिओ कंपनीच्या नेटवर्कला रेंज कसकाय येते? असा सवाल खासदार बारणे यांनी उपस्थित केला आहे. त्यावर, सभापती महोदया रमा देवी यांनी अध्यक्ष महोदय यासंदर्भात लक्ष देतील, असे सांगितले.
संसद आवारात जिओ कंपनीलाच जामरपासून बाहेर ठेवण्यात आलंय का? असा प्रश्न उपस्थित करत हे योग्य नसल्याचेही खासदार बारणे यांनी म्हटलं. बारणे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन याबाबतचा व्हिडिओ शेअर केला आहे. तसेच, जीओ कंपनीला संसदेत विशेष सुट देण्यात आलीय. जीओचे नेटवर्क जामरच्या बाहेर असून केंद्र सरकार अंबानीवर मेहरबान असल्याचा आरोपही बारणे यांनी केला आहे. यासंदर्भात आपण संसदेत प्रश्न उपस्थित करून सरकारचे लक्ष वेधल्याचेही ते म्हणाले.
नेटवर्कची समस्या गाव-खेड्यातही मोठ्या प्रमाणात आहे. कोरोनामुळे ऑनलाईन शिक्षण सुरू असतानाही अनेकदा गावागावात नेटवर्कच्या समस्या जाणवतात. मात्र, खासदार बारणे यांनी थेट संसद सभागृहातच नेटवर्कच्या समस्येचा प्रश्न उपस्थित केला. यावेळी, केंद्र सरकारचे जिओ नेटवर्कवर विशेष प्रेम असल्याकडे बारणे यांनी लक्ष वेधले.