हरीश गुप्ता, नवी दिल्ली आज मंगळवारी संसदेचा संपूर्ण एक तास पूर्णपणे महिला खासदारांसाठी समर्पित करता यावा, यासाठी लोकसभा आणि राज्यसभेचे पीठासीन अधिकारी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत. महिला खासदारांसाठी अधिवेशनाचा एक दिवस समर्पित करण्यात आला पाहिजे, अशी सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर बोलताना केली होती. त्यांची ही सूचना प्रत्यक्ष अंमलात आणण्याच्या दिशेने आता प्रयत्न केले जात आहेत.‘यावर मार्ग काढा आणि महिलांना विशेष वेळ द्या,’ अशी विनंती संसदीय कामकाज मंत्रालयाने लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन आणि उपराष्ट्रपती व राज्यसभेचे सभापती हमीद अंसारी यांच्याकडे केलेली आहे. लोकसभेत किमान ६५ आणि राज्यसभेत ३१ महिला खासदार आहेत. ही संख्या संसदेच्या दोन्ही सभागृहांमधील सदस्य संख्येच्या १२ टक्के आहे. तथापि, प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान उत्तरे देण्यासाठी ज्या खासदारांचे प्रश्न अगोदरच सूचीबद्ध करण्यात आले आहेत, त्या खासदारांच्या जागी आता महिला खासदारांचे प्रश्न घेणे ही खरी समस्या आहे. दुसरे असे की, शून्य तासासाठीदेखील महिला खासदारांना पीठासीन अधिकाऱ्यांकडे आगाऊ नोटीस द्यावी लागणार आहे. शून्य तासादरम्यान बोलण्यासाठी अगोदरच नोटीस देणाऱ्या खासदारांना बोलण्याची परवानगी नाकारण्याची, पीठासीन अधिकाऱ्यांना अनुमती देणारा असा कोणताही नियम नाही. संसदीय कामकाज राज्यमंत्री मुख्तार अब्बास नकवी यांना ‘लोकमत’ने यावर प्रश्न केला असता, ते म्हणाले, ‘आम्ही अद्याप यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न करीत आहोत.’
महिला खासदारांसाठी विशेष तास
By admin | Published: March 08, 2016 3:01 AM